दोडामार्ग | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्याला लाभलेले अथांग निसर्गसौंदर्य आणि पर्यटन क्षमता लक्षात घेता, दोडामार्ग तालुक्याचा विकास एक प्रमुख ‘टुरिझम हब’ म्हणून करण्यासाठी स्थानिक पातळीवर मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मालवण-तारकर्ली येथे आयोजित विशेष चर्चासत्राच्या पार्श्वभूमीवर, सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन महासंघाचे दोडामार्ग तालुका अध्यक्ष देवेंद्र शेटकर, सचिव पराशर सावंत आणि पत्रकार सुहास देसाई यांनी कोकण विभागाच्या विभागीय पर्यटन उपसंचालक डॉ. प्रज्ञा मनोहर यांची भेट घेऊन दोडामार्ग तालुक्यातील पर्यटन समस्या, संधी आणि प्रलंबित प्रकल्पांबाबत सविस्तर चर्चा केली.
या वेळी दोडामार्ग तालुक्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी ‘तिलारी वन संवर्धन प्रकल्प’ आणि इतर प्रमुख मुद्द्यांवर प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. डॉ. प्रज्ञा मनोहर यांनी या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत थेट व्यावसायिकांकडून सूचना जाणून घेतल्या.
’तिलारी वन संवर्धन प्रकल्प’ आणि साहसी पर्यटनाला वाव
दोडामार्ग तालुक्यात वन पर्यटन (Eco-Tourism) आणि साहसी पर्यटनाची प्रचंड क्षमता आहे
तिलारी परिसरात आणि तेरवाण मेढे येथे सुविधा केंद्र उभारले आहे या पर्यटन सुरू केल्यास राज्यातील व परराज्यातील पर्यटक मोठ्या संख्येने आकर्षित होऊ शकतात.
‘तळकट वन बाग’ येथील जैवविविधतेचे जतन करून तिथे निसर्गप्रेमींसाठी विशेष सुविधा निर्माण करणे आवश्यक आहे.
तालुक्यात बारमाहीवाहणारी तिलारी नदी परिसर या गावामध्ये मोठया प्रमाणात पर्यटनाची क्षमता असून प्रसिद्ध मागेली धबधबा आणि तिलारीचा निसर्गरम्य परिसर पर्यटकांचे मुख्य केंद्र बनू शकतो.
कसई दोडामार्ग येथील ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असलेल्या ‘कसईनाथ डोंगर’ परिसराचा विकास करण्याची मागणी करण्यात आली. येथे ट्रेकिंग मार्ग, सुरक्षितता आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्यास ट्रेकर्स आणि भाविकांसाठी हे एक उत्तम ठिकाण ठरेल, याकडे लक्ष वेधण्यात आले.
’होम स्टे’ चळवळीतून ग्रामीण रोजगार
ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी तालुक्यात ‘होम स्टे’ (Home Stay) संकल्पना मोठ्या प्रमाणावर राबवण्याची गरज देवेंद्र शेटकर यांनी व्यक्त केली. यामुळे पर्यटकांना अस्सल मालवणी संस्कृती, स्थानिक आदरातिथ्य आणि घरगुती जेवणाचा आस्वाद घेता येईल, तसेच स्थानिक तरुणांना घरबसल्या रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील.
तरुण उद्योजकांना स्टार्टअपचे आवाहन
तालुक्यातील रस्ते, वीज, पाणी आणि इंटरनेट यांसारख्या पायाभूत सुविधा सक्षम करून शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन पर्यटन महासंघाच्या वतीने करण्यात आले आहे. ग्रामीण, नैसर्गिक आणि वन्यप्राणी पर्यटनावर आधारित नवनवीन स्टार्टअप्स सुरू करण्यासाठी स्थानिक तरुणांनी पुढे यावे, जेणेकरून तालुक्याचा आर्थिक कायापालट होईल.
”दोडामार्ग तालुक्याला लाभलेले निसर्गाचे वरदान आणि त्याला आधुनिक सुविधा व शासकीय योजनांची जोड मिळाल्यास, येत्या काळात दोडामार्ग हे सिंधुदुर्गातील अग्रगण्य पर्यटन केंद्र म्हणून नावारूपास येईल. या दृष्टीने प्रशासन आणि स्थानिक व्यावसायिक यांच्यात सुसंवाद असणे अत्यंत गरजेचे आहे.”













