रत्नागिरी:
रत्नागिरी जिल्ह्यात येत्या काही दिवसांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून ७ व ८ जून रोजी तुरळक ठिकाणी मुसळधार पावसासह वादळी वाऱ्यांचा इशारा देण्यात आला आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली आणि भारत हवामान विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने प्रसिद्ध करण्यात आलेल्या हवामानावर आधारित कृषी सल्ला पत्रिकेत ही माहिती देण्यात आली आहे.
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्या अंदाजानुसार ५, ६ आणि ९ जून रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर ७ आणि ८ जून रोजी काही भागांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या कालावधीत विजांच्या कडकडाटासह ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने नागरिक आणि शेतकऱ्यांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. कमाल तापमान ३२ ते ३३ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २४ ते २५ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
हवामान विभागाने दक्षिण कोकणात नैऋत्य मोसमी पावसाच्या आगमनासाठी परिस्थिती अनुकूल असल्याचे नमूद केले असून शेतकऱ्यांनी भात, नागली आणि वरी पिकांच्या रोपवाटिकांची पेरणी सुरू करण्याचा सल्ला दिला आहे. मध्यम ते जोरदार पाऊस आणि सोसाट्याचा वारा अपेक्षित असल्याने नव्याने लागवड केलेल्या सुपारी, नारळ, आंबा आणि काजू कलमांना आधार देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच विजेपासून संरक्षणासाठी भारतीय हवामान विभागाच्या ‘दामिनी’ या मोबाईल अॅपचा वापर करण्याचाही सल्ला देण्यात आला आहे.
खरीप भात रोपवाटिकेसाठी गादी वाफ्यावर पेरणी करून योग्य खत व्यवस्थापन आणि बियाणे प्रक्रिया करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागली आणि वरी पिकांच्या रोपवाटिकांसाठीही शिफारस केलेल्या पद्धतीनुसार पेरणी करण्याचे मार्गदर्शन करण्यात आले आहे.
आंबा बागांमध्ये काढणीनंतर छाटणी करून बाग स्वच्छ ठेवावी, तर वाढलेल्या आर्द्रतेमुळे करपा व मर रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी बुरशीनाशकांची फवारणी करावी, असे कृषी तज्ज्ञांनी सांगितले आहे. नवीन आंबा आणि काजू लागवडीसाठी खड्डे तयार करून सेंद्रिय खतांचा वापर करण्याचाही सल्ला देण्यात आला आहे.
सुपारी आणि नारळ बागांमध्ये पावसाळ्यात वाढणाऱ्या बुरशीजन्य रोगांचा धोका लक्षात घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नवीन सुपारी व नारळ लागवडीसाठीही योग्य अंतर ठेवून खड्डे तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच काकडी, पडवळ, दोडका, कारले, लाल भोपळा, दुधी भोपळा यांसारख्या वेलवर्गीय भाजीपाला पिकांच्या लागवडीसाठी चांगल्या निचऱ्याची जमीन निवडण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
दरम्यान, पशुपालकांनी पावसाळ्यापूर्वी जनावरांचा चारा सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा तसेच वादळी वातावरणात जनावरे झाडाखाली न बांधता सुरक्षित गोठ्यात ठेवावीत, असे सांगण्यात आले आहे. कुक्कुटपालकांनीही शेडच्या खिडक्या व्यवस्थित झाकून पक्ष्यांचे पाऊस आणि वाऱ्यापासून संरक्षण करावे, असे कृषी सल्ला पत्रिकेत नमूद करण्यात आले आहे.













