अनिष्ट तपावत दूर करून या संस्थेने केलेले कार्य कौतुकास्पद : मनीष दळवी
वेंगुर्ले : दाजी नाईक
कोचरे विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या सभासदांना आज शुक्रवारी लाभांश ( डीव्हीडंट ) वाटप करण्यात आले. संस्था बरीच वर्षे अनिष्ट तपावतीत होती. संस्थेचे अध्यक्ष विष्णू उर्फ आप्पा फणसेकर यांनी सर्व सभासदांना व संचालकांना विश्वासात घेऊन आपल्या पाच वर्षाच्या कालावधीत संस्थेची जवळपास ५० लाखाची अनिष्ट तपावत दूर करून मागील वर्षे संस्था नफ्यात आणली. बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या या विकास संस्थेने केलेले कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे असे गौरवोद्गार सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी काढले.
कोचरे वि.का.स. सोसायटीच्या सभासदांना लाभांश वाटप कार्यक्रम आज मनीष दळवी यांच्या उपस्थितीत पार पडला. याप्रसंगी वेंगुर्ला पंचायत समितीचे सभापती शंकर घारे, उपसभापती सचिन देसाई, सोसायटी चेअरमन विष्णू उर्फ आपा फणसेकर, पाल सोसायटीचे चेअरमन कमलेश गावडे, मच्छिमार नेते वसंत तांडेल, मेढा सरपंच अवधूत रेगे, व्हाईस चेअरमन म्हापणकर गुरुजी, सर्व संचालक व मोठ्या संख्येने संस्थेचे सभासद व हितचिंतक यावेळी उपस्थित होते.
जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांना नवी दिल्ली येथे महात्मा गांधी नोबेल पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेच्या वतीने त्यांचा शाल श्रीफळ व लक्ष्मीची मूर्ती देऊन गौरव करण्यात आला. यावेळी बोलताना दळवी पुढे म्हणाले की, संस्था फक्त कर्ज वाटप करून थांबत नाही तर संस्थेने अनेक उपक्रम सुरू केले. सर्व थकबाकीदारांना विश्वासात घेऊन चेअरमन यांनी संस्थेचे सर्व थकबाकीदारांना व अनिष्ट तफावत ज्यांच्या कालावधीत झाले होते. त्यांच्याकडून ती भरून घेतली. आज संस्था स्वतःच्या पायावर उभे असून आठ लाख रुपयांची गुंतवणूक आहे. खरोखरच संस्थेचे कौतुक केले पाहिजे. दरम्यान सभासदानी दळवी यांच्या कडे संस्था इमारत बांधण्याचा प्रस्ताव ठेवला. मनीष दळवी यांनी आपण या संस्थेचे धडपड पाहिले असून त्यांना नेहमी सहकार्य करणार असून या इमारतीला ५० हजाराची देणगी जाहीर केली. त्याचप्रमाणे शासकीय योजनेतून इमारत बांधण्यासाठी सहकार्य करणार असे सांगितले.
यावेळी अन्य मान्यवरांनीही संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. उपस्थितांचे संस्थेच्या वतीने अध्यक्ष श्री आप्पा फणसेकर यांनी आभार मानले. सभासदांच्या वतीने संस्थेने बऱ्याच वर्षानंतर लाभांशचे वाटप केल्यामुळे सभासदांकडून संचालकांचे अभिनंदन करण्यात आले.













