ग्रंथालय शास्त्राच्या पंचसूत्री चे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांना त्यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. ०९ ऑगस्ट ग्रंथालय व माहिती शास्त्राचे पद्मश्री डॉक्टर एस आर रंगनाथन यांचा जन्मदिवस परंतु १२ ऑगस्ट रोजी त्यांचा हा जन्मदिवस “ग्रंथपाल दिन” म्हणून साजरा केला जातो. ग्रंथालय शास्त्राचे जनक म्हणून सर गोयर यांनी डॉक्टर एस आर रंगनाथन गौरव केला. डॉक्टर शियाली रामामृत रंगनाथन् यांचा जन्म दिनांक ०९ ऑगस्ट १८९२ रोजी तामिळनाडू मधील तंजावर जिल्ह्यातील शियाली या छोट्या खेड्यात झाला. डॉक्टर रंगनाथन यांना गणित या विषयाची खूप आवड होती. त्यांनी गणित या विषयातून एम. ए शिक्षण पूर्ण केले. व ख्रिश्चन कॉलेजांतून इंग्रजी विषयाचे शिक्षण घेऊन त्यांनी पदवी मिळवली.
मद्रासी विद्यापीठांमध्ये त्यांनी गणिताचे प्राध्यापक म्हणून आपल्या कार्याची यशस्वी सुरुवात केली. काही कालावधीनंतर मद्रास विद्यापीठांमध्ये ग्रंथपालाची नेमणूक करावयाची होती. त्यांच्या मित्राच्या आग्रहास्तव त्यांनी सविनय ग्रंथपाल पदासाठी अर्ज केला व ग्रंथपालाच्या जागेसाठी एकंदरीत १०० अर्जदारांना मागे टाकून ग्रंथपाल पदी आरूढ झाले. ग्रंथालय शास्त्राच्या प्रशिक्षणासाठी १९२४ रोजी लंडनमधील ‘स्कूल ऑफ लायब्ररीयनशिप’ युनिर्सिटी मध्ये त्यांनी प्रवेश घेतला. सार्वजनिक ग्रंथालयाची गरज ओळखून ३० जानेवारी १९२८ रोजी त्यांनी ‘मद्रास ग्रंथालय संघाची स्थापना केली. नंतर ग्रंथालयांची झपाट्याने प्रगती झाली. ग्रंथालयातील संपूर्ण कार्याला त्यांनी पाच सूत्रांमध्ये समाविष्ट केले आहे “फाईक् लॉ ऑफ लायब्ररी सायन्स” हा त्यांचा ग्रंथ इसवी सन १९३१ मध्ये मद्रास ग्रंथालय संघाने प्रकाशित केला. त्यामध्ये त्यांनी सांगितलेली पाच तत्त्वे पुढीलप्रमाणे आहेत
१) ग्रंथ हे उपयोगासाठी आहेत २) प्रत्येक वाचकाला त्याला हवा असलेला ग्रंथ मिळायला हवा
३) प्रत्येक ग्रंथाला त्याचा वाचक मिळाला पाहिजे
४) वाचकाचा व ग्रंथालय कर्मचाऱ्यांचा वेळ वाचला पाहिजे.
५) ग्रंथालय ही वर्धिष्णु संस्था आहे. खऱ्या अर्थाने आज या पाच तत्त्वानुसार ग्रंथालयाचे कार्य चालते.
रंगनाथन यांनी ग्रंथालयासाठी वैशिष्ट्यपूर्ण अशी कोलन वर्गीकरण पद्धती इ.स.१९३३ मध्ये विकसित केली. या वर्गीकरण पद्धतीचा आज भारत देशाबरोबर अन्य देशातही उपयोग केला जातो.
ग्रंथालयाच्या तालिकीकरणासाठी क्लासिफाईड कॅटलॉग कोड हि त्यांनी तयार केला. रंगनाथन यांनी आजवर ६० पेक्षा जास्त ग्रंथ व २५०० पेक्षा अधिक लेख लिहिले आहेत. इ. सन १९४५ ते १९४७ या कालावधी मध्ये बनारस हिंदू विद्यापीठ ग्रंथालयातील एक लाखापेक्षा जास्त ग्रंथाचे वर्गीकरण व तालिकीकरणाचे काम पूर्ण केले. इ.स. सन १९४७ ते १९५० मध्ये दिल्ली विद्यापीठात बि.लीब व एम. लिब हा अभ्यासक्रम सुरू केला. इ.स १९५० ते १९६२ मध्ये आंतरराष्ट्रीय F.I.D च्या वर्गीकरण संशोधन समूहाचे अध्यक्ष म्हणून कार्य केले. सरकारने १९६४ मध्ये “डॉक्टर्स ऑफ लेटर्स” हि पदवी बहाल केली. भारत सरकारने ग्रंथालयाच्या विकासाकरिता गठित केलेल्या समित्यांचे अध्यक्ष म्हणून त्यांनी कार्य केले.
भारतीयांमध्ये वाचनसंस्कृती अधिकाधिक रुजावी यासाठी डॉ. रंगनाथन यांनी ग्रंथालयशास्त्र आणि त्याच्या विकासात मोलाचे योगदान दिले. सुसंस्कृत समाजनिर्मितीसाठी शालेय शिक्षणासोबतच निरंतर शिक्षणदेखील किती आवश्यक असते, याचे महत्त्व डॉ. रंगनाथन् यांनी सर्वप्रथम पटवून दिले. शिक्षण मिळविणे सोपे आहे, पण शिक्षण देणे हे एक शास्त्र आहे त्याकरिता ग्रंथालयांचा विकास, प्रसार होऊन देशातील सर्वसामान्याना ज्ञानाची कवाडं विनामूल्य खुली करून द्यायला हवी, यासोबत वाचनसंस्कृती रुजवण्यासाठी जनतेला प्रवृत्त करणे गरजेचे आहे हा विचार डॉ. रंगनाथन यांनीच सर्वप्रथम देशात रुजवला.
इ.स.१९५७ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वयाच्या ८० वर्षापर्यंत अविरतपणे कार्य करणाऱ्या संशोधकाचे निधन २७ सप्टेंबर १९७२ या दिवशी झाले. परंतु त्यांनी लिहिलेल्या पाच सिद्धांताचे पालन आजही अविरतपणे होताना दिसते आहे. आज माहिती तंत्रज्ञानामुळे जग बदलले आहे. तसेच ग्रंथालयाच्या व्यवस्थापनामध्येही बदल झालेला दिसून येतो. सध्याच्या युगामध्ये डिजिटल ग्रंथालय, कर्म्युअल ग्रंथालय, कन्ट्रेन्ट डेक्लपमेंट, इ बुक्स, ई जर्नल्स याआधी मध्ये ग्रंथपाल पारंगत होताना दिसतो आहे. आज बरेचसे प्रकाशक आपले वाचन साहित्य इंटरनेटवर मुक्त स्वरुपांत उपलब्ध करून देत आहेत याचा चांगला अभ्यास असणे गरजेचे आहे. तंत्रज्ञान बदलले तरी मूलभूत शिक्षण बदलत नाही अशा नियमांची निर्मिती करणाऱ्या महान व्यक्तीला पुन्हा एकदा शतशः नमन ..
श्री. अमित लाखे
ग्रंथपाल
यशवंतराव भोंसले कॉलेज ऑफ फार्मसी,सावंतवाडी












