दापोली ब्रेकिंग :दापोलीत वारंवार होणाऱ्या वीज खंडितेविरोधात युवकाचा आंदोलनाचा इशारा….

दापोली(प्रतिनिधी):
दापोली तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून दररोज संध्याकाळच्या वेळेत वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. या समस्येमुळे विद्यार्थी, व्यावसायिक, शेतकरी तसेच सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर दापोलीतील युवा कार्यकर्ते स्वरूप महाजन यांनी महावितरणच्या कार्यपद्धतीविरोधात आक्रमक भूमिका घेत आंदोलनाचा इशारा दिला आहे.
संध्याकाळच्या वेळेत अचानक वीज खंडित होत असल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत असून व्यापारी वर्गाचेही आर्थिक नुकसान होत आहे. अनेक भागांमध्ये दररोज काही काळ वीज नसल्याने नागरिकांच्या दैनंदिन कामांवर विपरीत परिणाम होत आहे. याबाबत अनेकदा तक्रारी करूनही परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झालेली नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
या समस्येची गंभीर दखल घेत शिवसेनेचे युवा कार्यकर्ते स्वरूप महाजन यांनी महावितरण कार्यालयातच चटई टाकून झोपून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. जोपर्यंत दापोलीतील वीज पुरवठा सुरळीत होत नाही आणि वारंवार होणाऱ्या खंडिततेवर ठोस उपाययोजना होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
महाजन यांनी महावितरण प्रशासनाला तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन केले असून, नागरिकांच्या संयमाचा अंत पाहू नये असा इशाराही दिला आहे. दरम्यान, त्यांच्या या भूमिकेला अनेक नागरिकांनी पाठिंबा दर्शविला असून वीज समस्येच्या प्रश्नावर आता महावितरण प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दापोली तालुक्यातील वाढत्या वीज समस्येच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन महत्त्वाचे ठरणार असून प्रशासनाने तातडीने यावर तोडगा काढण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.