‘एक व्यक्ती एक पद’ नियमाचा केवळ माझ्यावरच का बडगा
एका व्यक्तीकडून पक्षात हस्तक्षेप होत असल्याचा आरोप
सावंतवाडी । प्रतिनिधी :’एक व्यक्ती एक पद’ या न्यायाचा दाखला देत माझ्याकडे नगरसेविका आणि नगरपरिषद सभापती पद असल्याचे सांगून महिला जिल्हाध्यक्षांनी माझ्याकडे शहर मंडल अध्यक्ष पदाचा राजीनामा मागितला. पक्षातील अनेक नेत्यांकडे दोन-दोन पदे असताना केवळ माझ्यावरच हा अन्याय का असा सवाल करीत एका सूत्रधाराच्या सततच्या हस्तक्षेपामुळे मी आज भाजप महिला शहर अध्यक्षपदाचा सन्मानाने राजीनामा देत आहे, असा थेट आरोप भाजपच्या सावंतवाडी शहर मंडल अध्यक्षा मोहिनी मडगावकर यांनी पत्रकार परिषदेत केला.
आपण केवळ शहर अध्यक्षपदाचा राजीनामा देत असून, भाजपमध्येच कायम राहणार असल्याचे आणि नगरसेविका म्हणून जनतेची सेवा करत राहणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यांच्या समर्थनासाठी त्यांच्या सर्व सहकारी महिला पदाधिकारी देखील राजीनामा देणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
पत्रकार परिषदेत मोहिनी मडगावकर यांनी थेट आरोप केले.
पक्षात एक सूत्रधार असून महिलांच्या कार्यात आणि शहराच्या राजकारणात या बाहेरच्या माणसाने ढवळाढवळ करण्याचे कारण काय ? या सूत्रधाराच्या सततच्या लुडबुडीमुळे शहरातील अनेक महिला पक्षात सक्रिय होत नाहीयेत. तो सातत्याने माझी बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याने माझी बदनामी करणे थांबवावे, माझ्याकडेही अनेक गोष्टींची इत्यंभूत माहिती आहे, असा इशारा मडगावकर यांनी दिला. पक्षातील महिला या भगिनीसमान असायला हव्यात, मात्र इथे एकाधिकारशाही चालवली जात असल्याचा खेद त्यांनी व्यक्त केला.
त्या म्हणाल्या, आम्ही जेव्हा ‘स्वाभिमान’ पक्षातून भाजपमध्ये आलो, तेव्हा पक्षात केवळ दोन महिला होत्या. आज शहरात पक्षाची ताकद आम्ही वाढवली. आमच्या नेतृत्वाखाली शहरात ११ नगरसेवक निवडून आले, अनेक महिला नगरसेविका झाल्या, अगदी महिला नगराध्यक्षा देखील भाजपची झाली. महिला मोर्चाने दिलेले सर्व कार्यक्रम आम्ही यशस्वी करून दाखवले. एवढे काम करूनही कौतुक करायचे सोडून उलट पद सोडण्याची मागणी केली जात आहे. जिल्ह्यात अनेक महिलांकडे दोन ते तीन पदे असताना, केवळ माझाच राजीनामा का मागितला जातोय? त्या सूत्रधाराला माझ्या जागी नक्की कोणाला आणायचे आहे? पक्ष कोणासाठी थांबत नाही, पण हे राजकारण नक्की कोणासाठी चालले आहे?” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. मला नगरसेविका म्हणून तिकीट देतानाही या मंडळींनी माझे तिकीट कापण्याचा प्रयत्न केला होता, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला.
मोहिनी मडगावकर यांनी स्पष्ट केले की, त्या केवळ महिला शहर अध्यक्षपदाचा राजीनामा देत आहेत. त्या म्हणाल्या, मला लोकांनी मोठ्या मताधिक्याने निवडून दिले आहे, त्यामुळे मी नगरसेविका म्हणून कायम राहणार आणि प्रभागातील विकासकामे करत राहणार. भाजपचे वरिष्ठ लोकप्रतिनिधी आणि प्रमुख पदाधिकारी यांचे मला नेहमीच चांगले सहकार्य लाभले आहे आणि मी भाजपमध्येच कायम राहणार आहे. पद काढून घेण्यापेक्षा मी सन्मानाने बाजूला होणे पसंत केले आहे, असे सांगत त्यांनी आपला राजीनामा सादर केला.













