18 वर्षांच्या संवर्धन प्रयत्नांना मोठे यश
इंग्रजी वृत्तसंस्थेने पुण्यातून प्रकाशित केली बातमी
रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातील कुळ्ये-फणसावळे परिसरातील खासगी वनक्षेत्रात रॉयल बंगाल वाघाचे दर्शन झाल्याने वन्यजीवप्रेमी आणि संवर्धन क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या दुर्मीळ घटनेचा व्हिडिओ जंगलात लावण्यात आलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये कैद झाला असून, रत्नागिरी जिल्ह्यातील खासगी जंगलात वाघाची नोंद होणे ही अत्यंत महत्त्वाची घटना मानली जात आहे.
इंग्रजी वृत्तपत्राने पुण्याहून ही बातमी online प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार कॅमेरा ट्रॅपमध्ये कैद झालेल्या दृश्यांमध्ये वाघ जंगलातून शांतपणे फिरताना दिसत आहे. या घटनेमुळे कोकणातील वनक्षेत्रांची पर्यावरणीय समृद्धी आणि संवर्धन प्रयत्नांचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे. तज्ज्ञांच्या मते, अशा मोठ्या शिकारी प्राण्याची उपस्थिती ही त्या परिसरातील परिसंस्थेच्या आरोग्याचे सकारात्मक लक्षण मानली जाते.
सुमारे 18 वर्षांपासून सुरू असलेल्या संवर्धन, वृक्षलागवड आणि नैसर्गिक अधिवास पुनर्स्थापना उपक्रमांचे हे फलित असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. एकेकाळी जंगलतोडीच्या धोक्याला सामोरे जाणाऱ्या या वनक्षेत्रात सातत्याने संरक्षणात्मक उपाययोजना राबविण्यात आल्या. त्यामुळे जंगलातील जैवविविधता वाढली असून वन्यजीवांसाठी पोषक अधिवास निर्माण झाला आहे.
रत्नागिरी जिल्हा आणि सह्याद्री पर्वतरांगांमधील जंगलांमध्ये जैवविविधतेचे संरक्षण करण्यासाठी विविध स्वयंसेवी संस्था, स्थानिक ग्रामस्थ आणि संवर्धक गेली अनेक वर्षे कार्यरत आहेत. त्यामुळे भविष्यात या भागात वन्यजीवांची संख्या आणि हालचाल वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या दुर्मीळ दर्शनामुळे वन्यजीव संवर्धन क्षेत्रात नवचैतन्य निर्माण झाले असून, कोकणातील जंगलांचे संवर्धन आणि संरक्षण अधिक बळकट करण्याची गरजही अधोरेखित झाली आहे.













