रत्नागिरी : लांजा तालुक्यातील कोत्रेवाडी येथील एका काजू फॅक्टरीत झालेल्या चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावण्यातस्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले असून या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून चोरीस गेलेला माल तसेच गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकूण ९ लाख ४१ हजार ८७९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यात ९० हजार रुपयांचा काजू माल होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ मे २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासून २९ मे रोजी सकाळी ९.२० वाजेपर्यंतच्या कालावधीत झिमन्स कॅश्यू पॉइंट या काजू फॅक्टरीचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी काजू गराची चोरी केली होती. याप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ११२/२०२६ भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५ अन्वये दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे सोपविण्यात आला होता. घटनास्थळी कोणतेही ठोस पुरावे उपलब्ध नसतानाही पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे संशयितांचा शोध घेतला. तपासादरम्यान शाहरुख मुराद साखरकर (वय ३०, रा. भाट्ये नवानगर, रत्नागिरी) आणि वजीद मोहम्मद अजीज खान (वय ४१, मूळ रा. बांद्रा पश्चिम, मुंबई, सध्या रा. भाट्ये, रत्नागिरी) यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान दोघांनीही चोरीची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
आरोपींकडून चोरीस गेलेला काजू माल तसेच गुन्ह्यात वापरलेले चारचाकी वाहन जप्त करण्यात आले असून एकूण ९ लाख ४१ हजार ८७९ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास लांजा पोलीस ठाण्याकडून सुरू आहे.
ही कारवाई रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे तसेच त्यांच्या पथकाने केली.












