सी.बी.एस.ई. राष्ट्रीय तायक्वॉंडो स्पर्धेसाठी रोटरी स्कूल, खेडच्या विद्यार्थ्यांची निवड

खेड – (प्रतिनिधी)

पुणे येथील वाघोली मधील न्यू टाईम्स स्कूल येथे दिनांक 5 ते 9 ऑगस्टदरम्यान सी.बी.एस.ई. झोन 2 तायक्वॉंडो चॅम्पियनशिप स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेत रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूल, खेडच्या खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी करत 3 सुवर्ण, 1 रौप्य व 3 कांस्य पदके पटकावत शाळेचे नाव राज्यभर गाजवले.
रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूलच्या एकूण 11 खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. यामध्ये कु. आयुष जाधव, कु. विधी गोरे व रूद्र चव्हाण यांनी सुवर्ण पदक, कु. अर्णव गोफाणे याने रौप्य पदक तर कु. स्वरा चव्हाण, कु. सई चाळके व कु. शांभवी वाघ यांनी कांस्य पदक मिळवत आपले आणि शाळेचे नाव उज्ज्वल केले. विशेष म्हणजे सुवर्ण व रौप्यपदक विजेत्यांची राष्ट्रीय स्तरावरील तायक्वॉंडो स्पर्धेसाठी निवड झाली असून ही स्पर्धा दिनांक 5 ते 9 सप्टेंबरदरम्यान इटावा, उत्तरप्रदेश येथे होणार आहे. यामुळे खेळाडूंवर सर्वच स्तरांतून अभिनंदनाचा व कौतुकाचा वर्षाव होत आहे. या यशामागे शाळेचे क्रीडाशिक्षक व तायक्वॉंडो प्रशिक्षक श्री. कृणाल चव्हाण यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे चेअरमन मा. बिपीनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापिका सौ. भूमिता पटेल तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन करून राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

हा विजय फक्त रोटरी स्कूलचाच नाही, तर खेड शहराच्या क्रीडा क्षेत्रासाठीही अभिमानाचा क्षण ठरला आहे.