मुख्याधिकाऱ्यांना ४ दिवसांत काम पूर्ण करण्याचे आदेश
सावंतवाडी । प्रतिनिधी :अधिकारी आणि ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे सावंतवाडी येथील वनविभाग समोरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी तुंबल्याने आज सकाळपासून अपघातांची मालिका सुरू झाली. पाणी साचल्यामुळे रस्त्याशेजारील उघड्या गटारांचा अंदाज न आल्याने अनेक पादचारी गटारात कोसळले, तर दुचाकी आणि चारचाकी वाहने अडकून पडल्याने या मार्गावरील वाहतूक तासभर ठप्प झाली होती. नागरिकांना सहन कराव्या लागणाऱ्या या त्रासाची पालकमंत्री नितेश राणे यांनी गंभीर दखल घेतली असून, सावंतवाडी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विनायक औंधकर यांना फोन करून पुढील ४ दिवसांच्या आत हे काम तातडीने पूर्ण करण्याचे कडक आदेश दिले आहेत.
सावंतवाडी येथील वनविभाग समोरील भागात सध्या मोरीचे काम सुरू आहे. मात्र, मध्यंतरी लागलेल्या निवडणूक आचारसंहितेमुळे वर्क ऑर्डर मिळण्यास उशीर झाल्याचा दावा नगरपरिषद अधिकाऱ्यांकडून करण्यात आला होता. प्रशासकीय दिरंगाईमुळे या कामाला कमालीचा विलंब झाला, ज्याचा फटका थेट सर्वसामान्य नागरिकांना बसला. पावसाचे पाणी थेट रस्त्यावर आल्याने संपूर्ण परिसराला तळ्याचे स्वरूप आले होते. त्यातच उघड्या गटारांमुळे आज सकाळपासून या ठिकाणी अनेक लहान-मोठे अपघात झाले. एक चारचाकी गाडी गटारात अडकल्याने मुख्य रस्त्यावर मोठी कोंडी झाली होती.
या संपूर्ण प्रकाराची माहिती मिळताच पालकमंत्री नितेश राणे यांनी मुख्याधिकाऱ्यांना फोन करत, अधिकारी आणि ठेकेदारांच्या चुकीमुळे जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे तसेच कोणत्याही परिस्थितीत पुढील चार दिवसांत हे काम पूर्ण करून रस्ता पूर्ववत करण्याचे आदेश दिले.
पालकमंत्र्यांनी स्वतः या समस्येची गंभीर दखल घेत अधिकाऱ्यांना तंबी दिल्याने रखडलेले काम आता वेगाने पूर्ण होईल, अशी आशा निर्माण झाली आहे. पालकमंत्र्यांच्या या तातडीच्या भूमिकेबद्दल सावंतवाडीतील स्थानिक नागरिक आणि वाहनधारकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.









