भुईबावड्याच्या सुपुत्राचा रयत शिक्षण संस्थेत मानाचा बहुमान

समन्वय समिती सदस्यपदी सुनील नारकर; स्थानिक शैक्षणिक विकासासाठी ठरणार लाभदायी

भुईबावडा l प्रतिनिधी :आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षण संस्था म्हणून ओळख असलेल्या रयत शिक्षण संस्था, सातारा यांच्या दक्षिण विभाग (सांगली विभागीय) समन्वय समितीच्या सदस्यपदी भुईबावडा गावचे सुपुत्र तथा मुंबईस्थित उद्योजक श्री. सुनील सदानंद नारकर यांची निवड करण्यात आली आहे. रयत शिक्षण संस्थेने प्रथमच कोकणातील प्रतिनिधीस या महत्त्वपूर्ण पदावर संधी दिल्याने भुईबावडा गावासह परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

रयत शिक्षण संस्थेचे सचिव श्री. विकास देशमुख यांनी नारकर यांना निवडीचे पत्र प्रदान केले. त्यांच्या निवडीमुळे भुईबावडा गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून शिक्षण क्षेत्रातील गावाच्या योगदानाला मोठी दाद मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.

भुईबावडा येथे रयत शिक्षण संस्थेची शाखा तसेच हायस्कूल कार्यरत आहे. सुनील नारकर यांची विभागीय समन्वय समितीवर झालेली निवड या शाखेच्या सर्वांगीण विकासासाठी, शैक्षणिक सुविधा वाढविण्यासाठी, विद्यार्थ्यांना आधुनिक शैक्षणिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी आणि स्थानिक शैक्षणिक प्रश्न संस्थेच्या स्तरावर प्रभावीपणे मांडण्यासाठी निश्चितच लाभदायी ठरेल, अशी अपेक्षा ग्रामस्थ, पालक व शिक्षकवर्गातून व्यक्त होत आहे.

शिक्षण व समाजकारण क्षेत्रातील योगदानाची दखल घेत नारकर यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांच्या माध्यमातून कोकणातील शैक्षणिक प्रश्नांना अधिक प्रभावीपणे वाचा फोडली जाईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

सुनील नारकर यांच्या निवडीबद्दल भुईबावडा गावासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ, शिक्षक, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते व विविध संघटनांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या निवडीमुळे भुईबावडा येथील रयत शिक्षण संस्थेच्या शाखेला आणि स्थानिक शिक्षण क्षेत्राला नवी उभारी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.