▪️ काळसे येथे उत्साहात वृक्षारोपण संपन्न
▪️जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईक नवरे यांचे मार्गदर्शन
मसुरे | झुंजार पेडणेकर : काळसे माळकेवाडी येथे प्रगत शेतकरी गट यांच्या प्रक्षेत्रावर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईक नवरे यांच्या हस्ते जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर सर्व गटातील शेतकऱ्यांसमवेत गो कृपा अमृत तयार करणे व बीज अंकुरण क्षमता तपासणे याचे प्रात्यक्षिक करण्यात आले. शेतकऱ्यांना जलकुंड , मागेल त्याला काजू कलमे, फार्मर आयडी काढणे याची गरज, गो कृपा अमृताचा जास्तीत जास्त वापर , बायोचार महत्त्व, अल निनो बाबत जागरूकता याबाबत सविस्तर मार्गदर्शन त्यांनी केले. सध्या आपण ‘अल निनो’सारख्या हवामान बदलाच्या संकटाचा सामना करत आहोत. अशा वेळी पारंपरिक शेतीला आधुनिक आणि शाश्वत तंत्रज्ञानाची जोड देणे आवश्यक आहे. म्हणूनच आज आपण इथे ‘गो कृपा अमृत’ तयार करण्याचे आणि ‘बीज अंकुरण क्षमता’ तपासण्याचे प्रात्यक्षिक घेतले. रासायनिक खतांचा वापर कमी करून गो कृपा अमृताचा जास्तीत जास्त वापर करा आणि जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी ‘बायोचार’चे महत्त्व समजून घ्या असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईक नवरे यांनी केले.
याबाबत गटातील सर्व शेतकरी बंधूंनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती भाग्यश्री नाईक नवरे यांचे आभार व्यक्त केले. यावेळी मंडळ कृषी अधिकारी मालवण श्री सिताराम परब, उपकृषी अधिकारी श्री धनंजय गावडे ,कृषी सेविका श्रीमती स्नेहा खोत तसेच ग्रामस्थ, शेतकरी उपस्थित होते.











