आमदार दीपक केसरकर यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी
सावंतवाडी । प्रतिनिधी :
सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील ३३ केव्ही वीज वाहिन्या भूमीगत करण्याच्या कामास तातडीने मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. तसेच सावंतवाडी रेल्वे स्थानकाचे ‘लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस’ असे नामकरण करण्याच्या मंत्रिमंडळाच्या निर्णयाबद्दल त्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत.
आमदार केसरकर यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सावंतवाडी मतदार संघातील बहुतांश भाग हा दुर्गम, डोंगराळ आणि जंगलाने वेढलेला आहे. दरवर्षी येथे अतिवृष्टी होत असल्याने वीज वाहिन्यांवर झाडे व फांद्या पडून वीज पुरवठा खंडित होतो. या भागातील लोखंडी पोल, फॅब्रिकेशन आणि डीटीसी स्ट्रक्चर सडले असून जुन्या तारा तुटण्याचे प्रमाण मोठे आहे. रात्रीच्या वेळी जंगलात लाईन फॉल्ट शोधणे जोखमीचे असल्याने वीज पुरवठा पूर्ववत होण्यास विलंब होतो, ज्यामुळे नागरिकांच्या रोषाला आणि आंदोलनांना सामोरे जावे लागते. ३३ केव्ही वाहिन्या भूमीगत केल्यास ही समस्या कायमस्वरूपी दूर होईल.
या संदर्भात महावितरणच्या सिंधुदुर्ग अधीक्षक अभियंत्यांसोबत ९ जून २०२५ रोजी बैठक झाली होती. त्यानुसार अधीक्षक अभियंत्यांनी मुख्य अभियंता (वितरण), प्रकाशगड मुंबई यांच्याकडे सविस्तर अहवाल सादर केला आहे.
मात्र, या प्रस्तावावर अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. सद्यस्थितीत पावसाळा सुरू झाल्याने वीज खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या कामाला तातडीने मंजुरी द्यावी, अशी विनंती केसरकर यांनी केली आहे.
मंत्रिमंडळाच्या निर्णयाबद्दल आभार
दरम्यान, सावंतवाडी रेल्वे स्थानकाला ‘लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस’ नाव देण्याच्या निर्णयाबद्दल आमदार केसरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष आभार मानले. कोकणच्या विकासात दिवंगत मधु दंडवते यांचे योगदान मोलाचे असून, या निर्णयामुळे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात समाधान आणि आनंदाचे वातावरण असल्याचे केसरकर यांनी म्हटले आहे.













