कलाकारांच्या मागण्यांवर मुख्य सचिवांच्या स्तरावर समन्वय बैठक घेणार;
मंत्री ॲड. आशिष शेलार यांची महत्त्वपूर्ण घोषणा
मुंबई । प्रतिनिधी :
कोकणच्या सांस्कृतिक अस्मितेचे प्रतीक असलेल्या पारंपारिक दशावतार लोककलेच्या जतन आणि संवर्धनासाठी राज्य शासन पूर्णपणे सकारात्मक आहे. या कलाकारांच्या प्रलंबित मागण्या विविध सरकारी विभागांशी संबंधित असल्याने, त्यावर तातडीने मार्ग काढण्यासाठी मुख्य सचिव स्तरावर लवकरच एक विशेष विभागीय समन्वय बैठक घेतली जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी आज येथे केली. तसेच दशावतार कलाकारांची एक अधिकृत निर्देशिका तयार करण्याच्या प्रस्तावालाही त्यांनी या बैठकीत तत्त्वतः मान्यता दिली.
कोकणातील पारंपारिक दशावतार लोककलेचे जतन, संवर्धन आणि कलाकारांच्या विविध समस्यांवर तोडगा काढण्यासाठी मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली आज प्रभादेवी येथील ‘पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी’मध्ये एक उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीला आमदार प्रमोद जठार, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, सिंधुदुर्गच्या अप्पर जिल्हाधिकारी सौ. शुभांगी साठे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे यांच्यासह दशावतार मंडळांचे प्रतिनिधी सुधाकर दळवी, तुषार नाईक, सौरभ पाटकर आणि अनेक ज्येष्ठ कलावंत उपस्थित होते.
या बैठकीत दशावतार कलेच्या प्रसारासाठी आणि कलाकारांच्या सोयीसाठी अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. मंत्री ॲड. शेलार म्हणाले की, दशावतार कलेची व्याप्ती वाढवण्यासाठी कोकणातील दशावतार महोत्सवांची संख्या तर वाढवली जाईलच, पण त्यासोबतच मुंबई आणि ठाणे सारख्या महानगरांमध्येही शासनाच्या माध्यमातून विशेष दशावतार महोत्सवांचे आयोजन करण्यात येईल. यामुळे मुंबईतील चाकरमान्यांना आणि नव्या पिढीला या समृद्ध लोककलेचा आस्वाद घेता येईल. याशिवाय, दशावतार कलेचे बाळकडू नव्या पिढीला मिळावे यासाठी दशावतार विषयक प्रशिक्षण कार्यशाळा स्थानिक संस्थांच्या मदतीने अधिक प्रभावीपणे राबवल्या जातील. तसेच, महाराष्ट्रातील वैभवशाली लोककलांचा समावेश शालेय अभ्यासक्रमात करण्यासाठी ‘बालभारती’ला तातडीने पत्र पाठवण्याचे निर्देशही मंत्री महोदयांनी दिले.
कलाकारांच्या इतर मागण्यांवर बोलताना मंत्री शेलार यांनी स्पष्ट केले की, कलाकारांच्या प्रवास सवलतीसाठी परिवहन विभागाकडे पाठपुरावा केला जाईल आणि त्यांच्या वाहनांवरील करसवलतीबाबतही सकारात्मक निर्णय घेतला जाईल. तसेच सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांत दशावतार कलाकारांसाठी स्वतंत्र सांस्कृतिक भवन उभारणे, कलाकारांसाठी विश्रांतीगृहे आणि मुंबई-ठाणे परिसरात तात्पुरती निवास व्यवस्था करण्याच्या मागण्यांवर शासन सकारात्मक विचार करत आहे. सध्या पात्र दशावतार कलापथकांना शासनाकडून अनुदान दिले जाते, तसेच ज्येष्ठ कलावंत मानधन योजनेअंतर्गत पात्र कलाकारांना दरमहा ५ हजार रुपयांचे मानधन उपलब्ध आहे. कोकणच्या मातीतील ही अजरामर कला टिकवून ठेवण्यासाठी आणि कलाकारांना हक्काचे व्यासपीठ व आदर मिळवून देण्यासाठी शासन कोणतीही कसर सोडणार नाही, अशी ग्वाही शेवटी त्यांनी दिली. शासनाच्या या सकारात्मक भूमिकेमुळे दशावतार कलाकारांमध्ये आता आनंदाचे वातावरण आहे.












