तरुणीकडून सव्वादोन लाखांची फसवणूक
कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
कणकवली : शासकीय नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत एका तरुणीकडून व तिच्या वडिलांकडून तब्बल २ लाख २४ हजार ६५० रुपये उकळून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी कणकवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी श्रीकृष्ण शामसुंदर कुडतरकर ( वय ५२, रा. तोंडवली कुडतरकरवाडी, ता. कणकवली) यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विद्या रविंद्र धर्णे (वय २५, रा. कनकनगर, कणकवली) यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे. एम.कॉम. शिक्षण पूर्ण केलेल्या विद्या धर्णे या नोकरीच्या शोधात असताना त्यांच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीमार्फत त्यांची श्रीकृष्ण कुडतरकर यांच्याशी ओळख झाली. कुडतरकर यांनी स्वतःला अँटी करप्शन विभागात कार्यरत असल्याचे सांगून जिल्हाधिकाऱ्यांच्या विशेष अधिकारातून गोपनीय विभागातील वरिष्ठ लिपिक पदांच्या जागा भरल्या जाणार असल्याचा दावा केला. तसेच दोन लाख रुपये खर्च केल्यास शासकीय नोकरी निश्चित मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या आश्वासनावर विश्वास ठेवून विद्या धर्णे यांच्या वडिलांनी २ ऑक्टोबर २०२५ ते २९ डिसेंबर २०२५ या कालावधीत विविध व्यवहारांद्वारे कुडतरकर यांच्या बँक खात्यांमध्ये एकूण २ लाख २४ हजार ६५० रुपये जमा केले. मात्र, त्यानंतर नोकरीबाबत कोणतीही कार्यवाही झाली नाही. तसेच पैसे परत मागितल्यानंतरही संबंधिताने टाळाटाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दरम्यान, अनेकदा पाठपुरावा करूनही रक्कम परत न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याची खात्री धर्णे कुटुंबाला झाली. त्यानंतर त्यांनी कणकवली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, स्वतःला अँटी करप्शन विभागातील अधिकारी असल्याचा बनाव करून शासकीय नोकरीचे आमिष दाखवत फिर्यादी व त्यांच्या वडिलांकडून लाखो रुपये उकळल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास कणकवली पोलिस करीत आहेत.












