संगमेश्वर पंचायत समितीचे देवरूख येथील ‘सभापती निवास’ की खाजगी ‘लॉजिंग’?

शासकीय बंगल्यात दुसऱ्याच कुटुंबाचा मुक्काम
दर्शनी बाजूच्या खिडक्यांवर सुकताहेत कपडे

देवरूख (प्रतिनिधी):

ज्या वास्तूने तालुक्याच्या विकासाची सूत्रे अनुभवली, जिथे एकेकाळी आदरायुक्त दरारा होता, ते संगमेश्वर पंचायत समितीचे देवरूख येथील अधिकृत ‘सभापती निवास’ सध्या तीव्र वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. गेल्या काही दिवसांपासून या शासकीय निवासस्थानाचा वापर चक्क खाजगी लॉजिंगसारखा सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे सध्या अधिकृत सभापती नव्हे, तर एक अनोळखी पाच ते सहा जणांचे कुटुंब लहान मुलांसह ठाण मांडून बसले आहे.

​या धक्कादायक प्रकारामुळे शासकीय नियमांची आणि पदाच्या प्रतिष्ठेची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. सर्वात संतापजनक आणि विचित्र बाब म्हणजे, या व्ही.आय.पी. बंगल्याच्या मुख्य प्रवेशद्वारावरच चक्क कपडे वाळत घालण्यात आले आहेत. त्यामुळे तालुक्याचे वैभव समजल्या जाणाऱ्या या बंगल्याची दर्शनी बाजू अत्यंत गलिच्छ आणि विद्रुप दिसत आहे. हे ‘सभापती निवास’ आहे की एखाद्याचे खाजगी घर, असा प्रश्न तिथे येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना पडत आहे.
​
​ १९९२ साली तत्कालीन सभापती सुभाष बने यांनी या निवासाची उभारणी केली. १९९३ सुभाष बने या बंगल्यात वास्तव्यासाठी आले. त्यानंतर आजवर झालेले प्रत्येक सभापती या शासकीय निवासस्थानात राहून तालुक्याचा गाडा हाकत होते. गेल्या ५-१० वर्षांत येथे सभापतींचे राहणे कमी झाले असले, तरी दरवर्षी या बंगल्याच्या देखभाल-दुरुस्तीवर जनतेच्या करातून हजारो रुपयांची उधळपट्टी केली जाते. असे असताना, केवळ सभापतींसाठी राखीव असलेल्या या शासकीय जागेत हे खाजगी कुटुंब कोणाच्या आशीर्वादाने राहत आहे? हा गंभीर प्रश्न आता निर्माण झाला आहे. या पूर्वी सुद्धा असे प्रकार झाल्याची चर्चा आहे.

ज्या बंगल्याच्या देखभालीसाठी शासकीय तिजोरीतून हजारो रुपये खर्च होतात, तो बंगला खाजगी लॉजिंग बनला कसा? प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष आहे की कोणाचे मूकसंमतीने हे ‘लाड’ पुरवले जात आहेत. मुळात नियम सांगतो की, शासकीय निवासस्थानात केवळ संबंधित लोकप्रतिनिधीच राहू शकतात. मग असे असताना या पाच-सहा जणांच्या कुटुंबाला तिथे प्रवेश कसा मिळाला? दोन दिवसांपासून हा तमाशा सुरू असताना पंचायत समितीचे प्रशासन झोपले आहे का, असा आक्रमक सवाल आता नागरिक विचारत आहेत. या बेकायदेशीर ‘लॉजिंग’ प्रकरणाची तात्काळ चौकशी होऊन दोषींवर कडक कारवाई व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे.

​मुळात १९९२ साली तत्कालीन धडाडीचे सभापती सुभाष बने यांनी या सभापती निवासाची संकल्पना मांडून हे दिमाखदार निवासस्थान बांधले. १९९३ साली ते स्वतः या बंगल्यात वास्तव्यासाठी आले. या निवासाचा मूळ हेतू अत्यंत उदात्त होता. तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या सर्वसामान्य जनतेला, कार्यकर्त्यांना आपल्या सभापतींना कधीही भेटता यावे, तिथेच जनतेचे प्रश्न सुटावेत आणि तालुक्याचा कारभार एकाच केंद्रातून सुकर व्हावा, या हेतूने हे निवासस्थान निर्माण करण्यात आले होते. त्यानंतरच्या काळात होणारा प्रत्येक सभापती या बंगल्यात आदराने राहायचा आणि तिथूनच तालुक्याची सूत्रे हलवायचा. मात्र, आज याच मूळ हेतूला हरताळ फासला गेला आहे.