गौरव पोंक्षे माखजन:
एकीकडे गतिमान सरकार,सबका साथ सबका विकास अशा मोठ्या मोठ्या गप्पा कानावर पडत असताना,माखजन आरवली रस्त्यावरून जाताना प्रत्येकाला कोणत्या जन्मीच पाप केल आहे अशी म्हणायची वेळ येत आहे.
माखजन आरवली रस्त्यावर पडलेल्या भल्या मोठ्या खड्ड्यांमध्ये चिखल पाणी साचल्यामुळे अक्षरशः डबकी तयार झाली आहेत.अनेक ठिकाणी सर्वसामान्य कारचा,पावसाळ्यात पूर्ण टायर बुडेल असे खड्डे तयार झाले आहेत.माखजन आरवली रस्ता हा नुसता सामान्य रस्ता राहिलेला नसून हा खड्डे मार्ग बनला आहे.सुमारे १० किमी एवढ्या लांबीच्या रस्त्याची वाताहात झाली आहे.
माखजन आरवली रस्ता हा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे येतो.या रस्त्याचे काँक्रिटीकरण प्रस्तावित आहे.परंतु त्या कामाला ,माखजन आरवली भागात सुरवातच झालेली नाही.त्यामुळे या रस्त्याची तात्पुरती डागडुजी करणे गरजेचे होते.हा रस्ता ज्या आमदारांच्या मतदार संघात येतो,ते सत्तेत आहेत,येथील जिल्हा परिषद,पंचायत समिती सदस्य देखील सत्तेत आहेत.पण. दुर्दैवाने येथील जनतेला मात्र खड्यातून प्रवास करावा लागत आहे.खर तर लोकप्रतिनिधींची हिच कामे असतात.यासाठीच जनता आपल्याला मतदान करते याचा विसर पडला की काय असा सवाल उपस्थित केला जात आहे.
माखजन आरवली रस्त्यावर सर्वत्र खड्डे पसरले आहेत,शिवाय रस्त्यावर खडी देखील पसरली आहे.सर्वत्र चिखल पाणी,आणि साईड पट्टीचा पत्ताच नाही.
चक्क रस्त्यावरून जाताना होडीतून जात असल्याचा भास येथील जनतेला होत आहे.आबाल वृद्ध,गर्भवती महिला,आजारी व्यक्ती याना या रस्त्याचा नाहक त्रास सोसावा लागत आहे.हा रस्ता सुमारे १६ गावांना जोडणारा मुख्य रस्ता आहे.मुख्य रस्त्याची ही अवस्था ,तर सबका साथ. सबका विकास हाच का ?असा खोचक सवाल उपस्थित केला जात आहे.
या रस्त्याची पावसाळ्यापूर्वी कोणतीची डागडुजी केली नसल्याने,सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामावर येथील ग्रामस्थांची तीव्र नाराजी पहायला मिळत आहे.










