लखमराजे भोंसले यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाची कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा
सावंतवाडी । प्रतिनिधी : गावागावातील स्थानिक देवस्थान व्यवस्थापन समित्यांना कारभार पाहताना येणाऱ्या विविध अडचणी आणि प्रशासकीय अडथळ्यांच्या पार्श्वभूमीवर बुधवारी सायंकाळी कोल्हापूर येथे एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. सावंतवाडी तालुका देवस्थान समन्वय समिती आणि कोल्हापूर येथील पश्चिम महाराष्ट्र देवस्थान कमिटीचे प्रशासक तथा कोल्हापूरचे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्यात जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक झाली.
सावंतवाडी संस्थानचे युवराज लखम राजे सावंत – भोसले यांच्या नेतृत्वाखालील या शिष्टमंडळाच्या मागण्यांवर जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ सकारात्मक निर्णय घेतले असून, देवस्थान व्यवस्थापन समितींच्या विविध मागण्यांबाबत त्वरीत कार्यवाही करण्याचे आदेश पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अधिकारी वर्गाला दिले आहेत. यामुळे जिल्ह्यातील देवस्थान कमिट्यांचे प्रलंबित प्रश्न लवकरच सुटतील, अशी आशा निर्माण झाली आहे.
या बैठकीत प्रामुख्याने स्थानिक देवस्थान उपसमिती निवडताना ग्रामसभेऐवजी थेट मंदिरामध्ये ‘गाव सभा’ आयोजित करण्यात यावी, अशी आग्रही मागणी करण्यात आली. ग्रामसभेतील तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी हा पर्याय सुचवण्यात आला. तसेच समिती सदस्यांसाठी प्रशासकीय प्रक्रियेत लागणारा चारित्र्य दाखला हा पोलीस पाटील अथवा सरपंच यांचाच मान्य करण्यात यावा, यावरही सविस्तर चर्चा झाली. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान कमिटीवर कायदेशीर बाजू मांडण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवस्थान प्रकरणांमधील निष्णात अशा दोन वकिलांची नियुक्ती करण्यात यावी, अशीही मागणी यावेळी शिष्टमंडळाने प्रशासकांकडे केली.
जिल्ह्यातील देवस्थान मंदिरांच्या विकासासाठी आणि पर्यटनासाठी आलेला निधी मिळण्यात होणारा प्रशासकीय उशीर टाळण्यासाठी एक महत्त्वाचा प्रस्ताव मांडण्यात आला. त्यानुसार, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान कमिटीच्या मंजुरीची वाट न पाहता तो निधी थेट त्या त्या व्यवस्थापन समितीच्या अधिकाराखाली वितरीत करावा, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. या सर्व मागण्यांमध्ये सर्वात मुख्य आणि महत्त्वाची मागणी म्हणजे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व मंदिरे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या अखत्यारीतून मुक्त करण्यात यावीत आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी स्वतंत्र देवस्थान कमिटी नेमण्यात यावी. या मुख्य विषयावर जिल्हाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा झाली असून जिल्हाधिकाऱ्यांनी यावर सकारात्मक पावले उचलण्याचे आश्वासन दिले आहे.
या महत्त्वपूर्ण आणि निर्णायक बैठकीला सावंतवाडी देवस्थान समन्वय समितीचे अध्यक्ष एम. एल. सावंत (कोलगाव), उपाध्यक्ष ज्ञानेश्वर परब (आंबेगाव), सचिव बाळू उर्फ राजाराम सावंत (बांदा) आणि कमिटी सल्लागार विलास सावंत (डिंगणे) उपस्थित होते. तसेच समितीचे सदस्य पंढरी राऊळ (सांगेली), यशवंत सावंत (डिंगणे), प्रतापराव देसाई (कळणे), प्रसाद परब, आणि सचिन सावंत आदी पदाधिकारी व सदस्यांनी या चर्चेत सक्रिय सहभाग घेतला. या बैठकीतील सकारात्मक निर्णयामुळे जिल्ह्यातील देवस्थान व्यवस्थापनाला मोठी गती मिळण्याची चिन्हे आहेत.













