ज्येष्ठ पत्रकार उत्तमकुमार जैन यांच्यावरील मारहाणीचा खेड पत्रकार संघाकडून जाहीर निषेध

दोषींवर कठोर कारवाईची मागणी

खेड (प्रतिनिधी) : खेड तालुका पत्रकार संघाचे ज्येष्ठ सल्लागार तथा वरिष्ठ पत्रकार उत्तमकुमार जैन यांच्यावर मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या एका सीएनजी पंपावर झालेल्या कथित मारहाणीच्या घटनेचा खेडमधील पत्रकारांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. या प्रकरणातील दोषींवर तातडीने आणि कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पत्रकारांकडून करण्यात आली.

यासंदर्भात खेडमधील पत्रकारांनी मंगळवारी दि. १० रोजी सायंकाळी ५.३० वाजता खेड पोलीस ठाण्यात भेट देऊन पोलिस प्रशासनाला निवेदन सादर केले. पत्रकारांवरील हल्ले हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि लोकशाही मूल्यांवर आघात करणारे असून अशा घटनांना वेळीच आळा घालणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.

उत्तमकुमार जैन हे पत्रकारितेच्या क्षेत्रातील ज्येष्ठ आणि अनुभवी व्यक्तिमत्त्व असून त्यांच्यावरील मारहाणीच्या घटनेमुळे पत्रकारांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे. घटनेची सखोल चौकशी करून संबंधित दोषींना कायद्यानुसार कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

निवेदन देण्यासाठी पत्रकार किशोर साळवी, सदानंद जंगम, दिवाकर प्रभू, सिद्धेश परशेट्ये, अनुज जोशी यांच्यासह अन्य पत्रकार उपस्थित होते. पत्रकारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गांभीर्याने घेऊन प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.