राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खेड शहर महिला अध्यक्षा अश्विनी दरेकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

खेड, प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांच्या खेड शहर महिला अध्यक्षा तथा खेड नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक ३ मधून पक्षाच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढलेल्या सौ. अश्विनी अशोक दरेकर यांनी शिवसेना नेते तथा माजी मंत्री रामदास  कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत मंडणगड येथे शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला. या प्रवेशामुळे खेड शहराच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून शिवसेनेच्या संघटनात्मक बळकटीसाठी हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
मंडणगड येथे आयोजित पक्षप्रवेश सोहळ्यात रामदासभाई कदम यांनी सौ. दरेकर यांचे शिवसेनेत स्वागत करत पक्षाच्या विचारधारेवर विश्वास व्यक्त केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महिलांनी अधिक सक्रियपणे राजकारणात सहभागी होऊन संघटना मजबूत करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
सौ. अश्विनी दरेकर या खेड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या सक्रिय महिला पदाधिकाऱ्यांपैकी एक म्हणून ओळखल्या जात होत्या. त्यांनी खेड नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक ३ मधून उमेदवारी देत स्थानिक राजकारणात आपली छाप निर्माण केली होती. त्यांच्या शिवसेना प्रवेशामुळे खेड शहरातील काही राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या पक्षप्रवेश सोहळ्यास शिवसेना खेड शहर प्रमुख कुंदन सातपुते, नगरसेवक स्वप्निल सैतवडेकर, मानस घोडे यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच राज्याचे गृहराज्यमंत्री Yogesh Kadam यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना अधिक मजबूत होत असून विविध पक्षांतील कार्यकर्त्यांचा शिवसेनेकडे वाढता ओढा दिसून येत असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये होती.
सौ. अश्विनी दरेकर यांच्या पक्षप्रवेशामुळे खेड शहरातील शिवसेना संघटनेला नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास शिवसेना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला असून आगामी काळात त्या पक्ष संघटनेच्या वाढीसाठी सक्रिय भूमिका बजावतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.