एक वर्षातच बांधकाम निकृष्ट ठरल्याचा आरोप
ग्रामस्थांची जिल्हाधिकाऱ्यांकडे चौकशी व कारवाईची मागणी
चिपळूण (प्रतिनिधी) : तालुक्यातील अलोरे देवरेवाडी येथील अंगणवाडी इमारतीच्या वर्गखोलीतील सीलिंग अचानक कोसळल्याची धक्कादायक घटना घडली असून सुदैवाने त्यावेळी वर्गात शिकणारी सुमारे १५ मुले उपस्थित नसल्याने मोठी दुर्घटना टळली. या घटनेनंतर अंगणवाडी इमारतीच्या बांधकामाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून ग्रामस्थांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. या संदर्भात वसंत चिपळूणकर आणि सिकंदर चिपळूणकर यांनी जिल्हाधिकारी तसेच गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, अवघ्या एका वर्षापूर्वी दुरुस्ती अथवा बांधकामासाठी खर्च करण्यात आला असतानाही अंगणवाडीचे छत कोसळल्याने कामाच्या गुणवत्तेबाबत शंका उपस्थित होत आहे. एकाच छतावर दोनवेळा खर्च दाखविण्यात आल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे. अंगणवाडी ही लहान मुलांच्या शिक्षण व संगोपनाची जागा असताना अशा प्रकारे छत कोसळणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. संबंधित ठेकेदाराने केलेल्या कामाची तांत्रिक तपासणी करून प्रत्यक्षात कोणत्या दर्जाचे साहित्य वापरण्यात आले, कामाची गुणवत्ता काय होती आणि निधीचा योग्य वापर झाला का याची चौकशी करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. छत कोसळण्याच्या घटनेमुळे अंगणवाडीत येणाऱ्या चिमुकल्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून संबंधित ठेकेदार, बांधकामाची देखरेख करणारे अधिकारी आणि जबाबदार घटकांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरातील पालक आणि ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून अंगणवाडी इमारतींच्या बांधकाम व दुरुस्ती कामांमधील संभाव्य अनियमिततेची चौकशी करून दोषींना शिक्षा देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर प्रशासन या प्रकरणात कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.












