बांदा पोलीस चेकपोस्टवरील कारवाई
बांदा : प्रतिनिधी
बांदा पोलीस चेकनाका येथे गुरुवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी केलेल्या कारवाईत गोव्याहून बेकायदेशीररित्या दुचाकीवरून वाहतूक केली जाणारी सुमारे ३४,७२० रुपये किमतीची विदेशी दारू जप्त केली आहे. या कारवाईत पोलिसांनी मोटारसायकलसह एकूण ४९,७२० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी नागेश आनंद चव्हाण (४६, रा. ओसरगाव, कणकवली याच्या विरुद्ध बांदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, गुरुवारी रात्री संशयित नागेश चव्हाण हा आपल्या ताब्यातील हिरो कंपनीची टू-व्हीलर (क्रमांक MH/07/AD/0585) वरून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी, बेकायदेशीर व विनापरवाना गोव्या बनावटीच्या दारूची वाहतूक करत बांदा चेकनाक्यावरून चालला होता. यावेळी तेथे तैनात असलेल्या पोलिसांनी त्याला थांबवून त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे वेगवेगळ्या ब्रँडच्या दारूच्या बाटल्या मिळून आल्या. एकूण ४९ हजार ७२० रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
बांदा सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. अधिक तपास बांदा पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार मुणगेकर करत आहेत.












