चिपळूण (प्रतिनिधी) : खेर्डी येथील ज्येष्ठ नागरिक तथा सामाजिक व धार्मिक कार्यात सक्रिय सहभाग असलेल्या लिलाबाई धोंडीराम दाभोळकर (९७) यांचे बुधवारी पहाटे ४ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने खेर्डी गावावर शोककळा पसरली असून सर्व स्तरांतून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मूळच्या खेड येथील भोजने कुटुंबातील असलेल्या लिलाबाई दाभोळकर विवाहानंतर खेर्डी येथे स्थायिक झाल्या. प्रेमळ, धार्मिक आणि सेवाभावी स्वभावामुळे त्या संपूर्ण गावात ‘लीला काकू’ या नावाने परिचित होत्या. सामाजिक व धार्मिक उपक्रमांमध्ये त्यांचा नेहमीच पुढाकार असायचा. विशेषतः श्रावण महिन्यात धार्मिक ग्रंथांचे वाचन, पारायण तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात त्या सक्रिय असत. त्यांचे पती धोंडीराम दाभोळकर हे परिसरातील यशस्वी व्यावसायिक म्हणून ओळखले जात होते. कुटुंबातील संस्कार आणि शिक्षणाला महत्त्व देत लिलाबाईंनी आपल्या तीनही मुलांना उत्तम शिक्षण देऊन समाजात सक्षमपणे उभे केले. त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव अनिल दाभोळकर हे माजी पंचायत समिती सदस्य असून चिपळूण अर्बन बँकेचे अनेक वर्षे संचालक राहिले आहेत. तसेच खेर्डी ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून त्यांनी तब्बल नऊ वर्षे काम पाहिले असून जिल्हा परिषदेतही त्यांनी योगदान दिले आहे. दुसरे चिरंजीव सुनील दाभोळकर हे यशस्वी व्यावसायिक असून त्यांनीही खेर्डी ग्रामपंचायतीचे सरपंचपद भूषविले आहे. धाकटे चिरंजीव डॉ. अजित दाभोळकर हे नामवंत वैद्यकीय व्यावसायिक म्हणून परिचित आहेत. लिलाबाई दाभोळकर यांच्या पश्चात तीन मुलगे, सुना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाची बातमी समजताच गावातील नागरिक, सामाजिक, राजकीय व व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवरांनी दाभोळकर कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी भेट दिली. त्यांच्यावर बुधवारी सायंकाळी खेर्डी येथील वैकुंठ स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी ग्रामस्थ, नातेवाईक, मित्रपरिवार आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. लिलाबाई दाभोळकर यांच्या निधनाने खेर्डी गावातील एक प्रेमळ, धार्मिक आणि समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.












