विनापरवाना गुरांची वाहतूक ; तिघांविरोधात गुन्हा

कणकवली : बोलेरो पिकअपमधून विनापरवाना गुरांची वाहतूक करताना आढळून आल्याने तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार गुरुवारी (११ जून) रात्री सुमारे ९.३० वाजण्याच्या सुमारास कनेडी-फोंडाघाट मार्गावर उघडकीस आला.

पोलीस हवालदार स्वप्नील जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, बोलेरो वाहनातून दोन गायी व दोन बैल पाडे यांची दाटीवाटीने वाहतूक करून कोल्हापूरच्या दिशेने नेले जात होते. याप्रकरणी हातकणंगले येथील माणीक बाबासो पाटील (४७), अमर बाबासो पाटील (४३) आणि इजाज शब्बीर जामदार (३५) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधितांना पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आली असून अधिक तपास पोलीस हवालदार सुभाष शिवगण करीत आहेत.

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार गुरांची वाहतूक करणारे वाहन फोंडाघाट येथील ग्रामस्थांनी अडवून चालक व संबंधितांना जाब विचारला. वाहतूक केली जात असलेली गुरे हरकुळ बु. परिसरातील असल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी काही नागरिकांनी संबंधितांना मारहाण केल्याची तसेच वाहनाचे नुकसान झाल्याची चर्चा परिसरात होती.

या घटनेनंतर शुक्रवारी सायंकाळी कणकवली पोलीस ठाण्यात मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झाली होती. पोलिसांकडून संपूर्ण घटनेचा तपास सुरू असून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.