खेड – प्रतिनिधी :
शुक्रवार दिनांक 12 जून 2026 रोजी रोटरी इंग्लिश मिडियम स्कूल खेडमध्ये भारत सरकारच्या ‘टीबी मुक्त भारत अभियान’ अंतर्गत क्षयरोग जनजागृती रॅली काढून समाजात क्षयरोगाविषयी (टीबी) जागरूकता निर्माण केली.
या उपक्रमाप्रसंगी विद्यार्थ्यांनी शाळेपासून परिसरातील विविध भागांमध्ये फलक, घोषवाक्ये आणि संदेशांच्या माध्यमातून टीबी प्रतिबंध, लक्षणे व उपचार यांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवली. ‘टीबी हरेल, भारत जिंकेल’ ‘वेळीच तपासणी, टीबीवर मात’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. रॅलीनंतर विद्यार्थ्यांनी मीनाक्षी निवाते व श्री. अमोल नरवणकर या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली समुदायामध्ये जाऊन पथनाट्य सादर केले. या पथनाट्याद्वारे टीबीची लक्षणे ओळखणे, वेळेत निदान करून उपचार घेणे आणि समाजातील गैरसमज दूर करणे याबाबत प्रभावी संदेश देण्यात आला. विद्यार्थ्यांच्या अभिनयाने उपस्थित नागरिकांचे लक्ष वेधून घेतले आणि आरोग्याबाबत सकारात्मक जनजागृती झाली.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण झाली असून नागरिकांनाही टीबीमुक्त भारताच्या ध्येयासाठी योगदान देण्याचे आवाहन करण्यात आले. शाळेच्या शिक्षकांनी आणि पालकांनी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले. ‘जागरूक नागरिक, निरोगी समाज आणि टीबीमुक्त भारत’ हा संदेश देत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
संस्थेचे चेअरमन मा. बिपीनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भूमिता पटेल सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदी मान्यवर यांनी या नाविण्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक केले.












