वर्ल्ड योगासन चॅम्पियन तन्वी रेडीजचा रोटरी इंग्लिश मिडियम स्कूलतर्फे गौरव

खेड (प्रतिनिधी) : गुजरातमधील अहमदाबाद येथे ४ ते ८ जून २०२६ या कालावधीत पार पडलेल्या पहिल्या वर्ल्ड योगासन चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करून दोन सुवर्णपदके पटकावणाऱ्या कु. तन्वी रेडीज हिचा रोटरी इंग्लिश मिडियम स्कूलतर्फे विशेष सत्कार करण्यात आला. तिच्या या उल्लेखनीय यशामुळे खेडसह संपूर्ण जिल्ह्याचा गौरव वाढला आहे.
जागतिक स्तरावरील या प्रतिष्ठित स्पर्धेत ७५ हून अधिक देशांमधील ५०० पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग घेतला होता. अत्यंत चुरशीच्या वातावरणात झालेल्या या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत जगभरात आपली छाप पाडली. भारताने एकूण १०२ सुवर्ण, ९ रौप्य आणि ३ कांस्य अशी ११४ पदके जिंकून पदतालिकेत अव्वल स्थान मिळवले.
या स्पर्धेतील सिनिअर गटाच्या वैयक्तिक प्रकारात तन्वी रेडीज हिने सुवर्णपदक पटकावत देशाचा मान उंचावला. याशिवाय सांघिक प्रकारातही भारतीय संघाला सुवर्णपदक मिळवून देण्यात तिने महत्त्वपूर्ण योगदान दिले. तिच्या या ऐतिहासिक आणि अभिमानास्पद यशाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून ती युवा खेळाडूंसाठी प्रेरणास्थान ठरत आहे.
तन्वीच्या या जागतिक यशाची दखल घेत रोटरी इंग्लिश मिडियम स्कूलतर्फे तिचा पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. यावेळी संस्थेचे चेअरमन मा. बिपीनदादा पाटणे, संस्थेचे पदाधिकारी, शिक्षकवृंद तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भूमिता पटेल उपस्थित होत्या.
यावेळी मान्यवरांनी तन्वीचे अभिनंदन करत तिच्या मेहनतीचे आणि जिद्दीचे कौतुक केले. भविष्यातही आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन करून देशाचे नाव अधिक उज्ज्वल करावे, अशा शुभेच्छा देत तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या. तन्वी रेडीजच्या या यशामुळे खेड तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून क्रीडा क्षेत्रातील तरुणांसाठी तिची कामगिरी प्रेरणादायी ठरत आहे.