जीवनमान उंचावण्यासाठी वालावलकर हॉस्पिटलचा पुढाकार
चिपळूण : बदलती जीवनशैली, वाढता ताणतणाव आणि हृदय व श्वसनविकारांच्या वाढत्या समस्यांच्या पार्श्वभूमीवर चिपळूण येथील वालावलकर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी अंतर्गत सुरू करण्यात आलेली ‘सीव्हीआरएस (CVRS) फिटनेस ओपीडी’ रुग्णांसाठी वरदान ठरत आहे. २०२४ मध्ये सुरू झालेल्या या विभागाने अल्पावधीतच आरोग्यसेवेत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली असून हृदय आणि श्वसनविकारग्रस्त रुग्णांच्या पुनर्वसनासह सर्वसामान्य नागरिकांच्या फिटनेस मूल्यांकनासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
पुराव्यावर आधारित आरोग्यसेवा देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या ओपीडीमध्ये रुग्णांची सखोल तपासणी करून त्यानंतर फिजिओथेरपी आणि व्यायाम कार्यक्रम आखले जातात. केवळ आजारांवर उपचार करण्यापेक्षा आजार होऊ नयेत यासाठी प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा देण्यावर या विभागाचा विशेष भर असल्याची माहिती विभागप्रमुख डॉ. सौ. आस्मा शर्मा यांनी दिली.
या ओपीडीमध्ये कार्डियाक आणि पल्मनरी रिहॅबिलिटेशनबरोबरच वजन व्यवस्थापनावरही विशेष लक्ष केंद्रित केले जाते. रुग्णांचे अचूक मूल्यांकन करण्यासाठी बीएमआय, वेस्ट-हिप रेशो, स्नायू शक्ती व लवचिकता चाचणी, मॉडिफाईड हार्वर्ड स्टेप टेस्ट तसेच सिक्स-मिनिट वॉक टेस्ट अशा विविध तपासण्या केल्या जातात. या सर्व चाचण्यांच्या आधारे प्रत्येक रुग्णासाठी स्वतंत्र आणि वैयक्तिकृत व्यायाम कार्यक्रम तयार केला जातो. त्यामुळे रुग्णांच्या आरोग्यात जलद सुधारणा होण्यास मदत मिळत असल्याचे सांगण्यात आले.
सीव्हीआरएस फिटनेस ओपीडी केवळ रुग्णालयापुरती मर्यादित न राहता समाजामध्ये आरोग्यविषयक जनजागृतीचेही महत्त्वपूर्ण कार्य करत आहे. जागतिक हृदय दिन, जागतिक तंबाखूमुक्त दिन आणि आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. मोफत फिटनेस स्क्रिनिंग, व्यायाम प्रात्यक्षिके आणि श्वसन व्यायाम कार्यशाळांद्वारे नागरिकांना निरोगी जीवनशैलीचे महत्त्व पटवून दिले जाते.
या ओपीडीच्या सेवांमुळे रुग्णांची हृदय आणि श्वसन कार्यक्षमता सुधारण्यास मदत होत असून शारीरिक सहनशक्ती वाढणे, स्नायू बळकट होणे, वजन नियंत्रणात राहणे आणि ताणतणाव कमी होणे यासारखे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. त्यामुळे अनेक रुग्ण अधिक निरोगी आणि सक्रिय जीवनशैलीकडे वाटचाल करत असल्याची माहिती डॉ. आस्मा शर्मा यांनी दिली.
सीव्हीआरएस फिटनेस ओपीडी हा पुनर्वसन आणि प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेचा महत्त्वपूर्ण आधारस्तंभ ठरत असून तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि सर्वांगीण मूल्यांकनामुळे आरोग्य क्षेत्रात मोलाचे योगदान देत आहे. आपल्या आरोग्याबाबत जागरूक असलेल्या नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रुग्णालयाच्या वैद्यकीय संचालिका डॉ. सौ. सुवर्णा पाटील यांनी केले आहे.
दरम्यान, या ओपीडीला नागरिकांचा वाढता प्रतिसाद मिळत असून सन २०२४ मध्ये ५ हजार, सन २०२५ मध्ये ६ हजार १२ आणि चालू वर्षात आतापर्यंत २ हजार ६९३ रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे या उपक्रमाची उपयुक्तता आणि विश्वासार्हता अधोरेखित होत आहे.













