साखरपा सकपाळवाडी येथे तरूणीने गळफास घेऊन संपवले जीवन

साखरप्यात उडाली खळबळ

साखरपा (वार्ताहर) :

संगमेश्वर तालुक्यातील साखरपा सकपाळवाडी येथील तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज रविवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. मिळालेल्या माहितीनुसार श्रद्धा अशोक सकपाळ (वय-२७) हिने दुपारी २-३० ते ३ वाजण्याच्या सुमारास घराशेजारील वाड्यातील लाकडी वाशाला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. या घटनेने साखरपा परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

घटनेची माहिती मिळताच साखरपा पोलीस दूर क्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद वाघाटे, पोलीस हेड कॉन्स्टेबल नितीन जाधव, महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल मनस्वी पावसकर, पोलीस कॉन्स्टेबल तानाजी पाटील, साखरपा पोलीस पाटील शैलजा पवार, साखरपा उपसरपंच शशिकांत लिंगायत यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आला. यावेळी देवरुखचे पोलीस निरीक्षक उदय झावरे यांनी साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन घटनेची माहिती घेतली. मात्र आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. पोलीसांकडून घटनेचा तपास सुरू आहे.