जागतिक पर्यटन नकाशावर सिंधुदुर्ग…!

जागतिक पर्यटन नकाशावर सिंधुदुर्ग…!

वार्तापत्र -कोकण. संतोष वायंगणकर
कोकणाला निसर्गाची देणं आहे. इतिहासाचा वारसा आहे…कातळ शिल्पांचा ठेवा आहे. मालवणी संस्कृतीचा पदर आहे.अध्यात्म अन सांस्कृतीक परंपराची झाक आहे. निसर्गाने इतक भरभरून दिलेलं असताना त्याचा उपयोग योग्यपद्धतीने आजवर करण्यात आलेला नाही.या सहज सुंदर नैसर्गिकतेच्या आधारावर पर्यटन व्यवसाय अधिक चांगल्यापद्धतीने विकसित करता येणे सहज शक्य होते…जागतिक पर्यटन स्थळाच्या निमित्ताने एक नविन संधी निर्माण झाली आहे. यापुढच्या काळात सरकार म्हणून अनेक गोष्टी कोकणात विशेषकरून सिंधुदुर्गला सहज उपलब्ध होणार आहेत. त्याचा योग्य तो लाभ घेण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी केला पाहिजे. अन्यथ: तो आपलाच करंटेपणा ठरेल.

दिल्लीत निती आयोगाची बैठक नुकतीच पार पडली. या निती आयोगाच्या बैठकीत २०४७ पर्यंत देशाच्या अर्थव्यवस्थेवर चर्चा झाली. यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक राज्य एक जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ यामध्ये महाराष्ट्रात सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन आणि नाशिक या दोन जिल्ह्यांचा विकास केला जाणार असल्याचा कृती आराखडा सर्वांसमोर मांडला.
खरंतर १९९७ सालीच सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला आहे. भारतातील सिंधुदुर्ग हा पहिला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला होता. त्यामुळे पर्यटन जिल्हा म्हणून विकसित होत असताना केवळ सिंधुदुर्गच नव्हेतर पर्यटनदृष्ट्या कोकणात एक वेगळे वातावरण तयार झालेले आहे. कोकणातील नैसर्गिक सृष्टी सौंदर्याच योग्य पद्धतीने वापर होऊन जर पर्यटन विकासाला चालना मिळत असेल तर ते अधिक योग्य ठरणारे आहे. आजवर एका विशिष्ट सीमारेषेवर असणारं कोकणच पर्यटन आता खऱ्याअर्थाने अधिक विस्तारले आहे. कोकण पर्यटनदृष्ट्या जागतिक नकाशावर येत असताना निश्चितपणे त्याचा फायदा एकट्या सिंधुदुर्ग जिल्ह्यालाच नाहीतर सिंधुदुर्ग बरोबर रायगड, रत्नागिरी या तिन्ही जिल्ह्यांना याचा निश्चितपणे भविष्यकालीन अधिक मोठा फायदा होणार आहे.
निती आयोगाच्या बैठकीत महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पर्यटन विकासाची दृष्टीकोन स्पष्ट केला गेला आहे. महाराष्ट्राच्या विकासाचा रोडमॅप मांडत असताना महाराष्ट्राच्या आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला पर्यटन व्यवसायातून मोठी बळकटी मिळणारी आहे. आज जगभरामध्ये पर्यटन व्यवसायातून आर्थिक सुबत्ता आणण्याचा प्रयत्न होत राहीला आहे. गोवा राज्याच्या सीमेवर असलेल्या कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्याकाही वर्षांमध्ये पर्यटन व्यवसाय वाढला आहेच. पर्यटन व्यवसायात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या तिन्ही जिल्ह्यामध्ये वाढ तर निश्चितच झाली आहे. परंतु कोकणात पर्यटन व्यवसाय जरी वाढला असला तरीही कोकणातील पर्यटनस्थळांवर आजही पायाभूत सुविधांचा अभाव आहे. रस्ते, पर्यटन स्थळांवरचे पार्किंग, पर्यटकांना आवश्यक असणाऱ्या सुविधा आजही कोकणातील पर्यटन स्थळांवर नाहीत. गोवा राज्यामध्ये पर्यटन व्यवसायाला फारमोठ महत्व आणि प्राधान्य देण्यात आले.
गोव्याचे अर्थकारण पूर्णपणे पर्यटन व्यवसायावर अवलंबून आहे. गोवा सरकारने जगभरातले पर्यटक गोव्याला कसे येतील, रहातील यासाठी आवश्यक कोणत्या सुविधा आहेत त्याची व्यवस्था गोवा सरकारने केली. त्यामुळेच तिथला पर्यटन व्यवसाय बहरला आहे. महाराष्ट्रातील आजवर असणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी कोकणातील पर्यटन व्यवसायातून राज्यसरकारच्या तिजोरीला कशा पद्धतीने हातभार लागू शकतो याचा विचारच कधी केला नव्हता. त्यात अनेक कारणांपैकी कोकणकडे राज्यातील सत्तेवर असणाऱ्यांचा संकुचित दृष्टीकोन हा देखिल एक महत्वाचा भाग आहे. या सर्व पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील महायुती सरकारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘एक राज्य एक जागतिक पर्यटन स्थळ’ यामध्ये सिंधुदुर्गला स्थान दिले. अर्थात नैसर्गिक न्यायाने पर्यटनस्थळ म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याला नाकारता येण्यासारखे काहीच नव्हते. जागतिक दर्जाचे पर्यटन विकसित करत असताना अनेक चांगल्या गोष्टी पुढे येत आहेत. कोकणात पहिले अंडरवॉटर म्युझियम सिंधुदुर्ग निवती रॉक येथे होत आहे. निश्चितपणे त्याचा पर्यटन व्यवसायात फार मोठा फायदा होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विमान सेवेला अधिक महत्व देत कोकणातील विमानसेवा कनेक्टिव्हीटी वाढवली जाणार आहे. सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये असलेल्या गडकिल्ल्यांचे संवर्धन करून त्याद्वारे पर्यटकांना इतिहासाच्या पाऊलखुणांचा एक वेगळा अनुभव आजवर मिळत राहीला आहे. त्यादृष्टीकोनातूनही अधिक आणखी सुविधा कशारितीने उपलब्ध करून देता येईल ते देखिल प्रयत्न यानिमित्ताने होणार आहेत. कोकणातील पर्यटनस्थळ विकासाला येणाऱ्या मर्यादा आता असणार नाहीत. खऱ्याअर्थाने पर्यटनस्थळांच्या विकासाला आता गती प्राप्त होणार आहे. सिंधुदुर्ग जागतिक पर्यटन स्थळ म्हणून विकसित होत असताना पर्यटन व्यवसाय देखिल निश्चितपणे फारमोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. जागतिक स्तरावरच्या पर्यटनस्थळांचा विचार होतांना निश्चितपणे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनस्थळ विकासासाठी आवश्यक असणारा निधीही मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणार आहे. पर्यटन विकासाचा विषयात कोकणच्या सिंधुदुर्गचा समावेश असल्याने भविष्यात विकासाची गती अधिक असेल.
कोकणाला निसर्गाची देणं आहे. इतिहासाचा वारसा आहे…कातळ शिल्पांचा ठेवा आहे. मालवणी संस्कृतीचा पदर आहे.अध्यात्म अन सांस्कृतीक परंपराची झाक आहे. निसर्गाने इतक भरभरून दिलेलं असताना त्याचा उपयोग योग्यपद्धतीने आजवर करण्यात आलेला नाही.या सहज सुंदर नैसर्गिकतेच्या आधारावर पर्यटन व्यवसाय अधिक चांगल्यापद्धतीने विकसित करता येणे सहज शक्य होते. परंतु त्यासाठीचे आवश्यक असणारा दूरदृष्टीकोनाने विचार करण्यात आला नाही. सहाजिकच एका विशिष्ट्य मर्यादेपलिकडे विकासाच्या वाटा अधिक मोकळ्या होण्याची आवश्यकता असताना होऊ शकल्या नाहीत. जागतिक पर्यटन स्थळाच्या निमित्ताने एक नविन संधी निर्माण झाली आहे. यापुढच्या काळात सरकार म्हणून अनेक गोष्टी कोकणात विशेषकरून सिंधुदुर्गला सहज उपलब्ध होणार आहेत. त्याचा योग्य तो लाभ घेण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी केला पाहिजे. अन्यथ: तो आपलाच करंटेपणा ठरेल. तसे होता कामा नये. आजवर नव्हती एवढी मोठी संधी सिंधुदुर्गच्या विकासाला आली आहे. त्याचा सकारात्मकतेने विचार कोकणाने केला पाहिजे. राजकारणापलिकडे जाऊन विकासाची एक नवीदृष्टी आली पाहिजे. तरच या सर्वांचा कोकणाला काही फायदा मिळू शकेल.