परबवाडा-पवारवाडीत शॉर्टसर्किटमुळे आग; ब्युटी पार्लरसह साहित्य जळून खाक..

किरण पवार यांचे अंदाजे ३ लाख ४९ हजार रुपयांचे नुकसान; सुदैवाने जीवितहानी टळली

वेंगुर्ले : प्रतिनिधी

वेंगुर्ले तालुक्यातील परबवाडा-पवारवाडी येथे श्री. किरण भाऊ पवार यांच्या घराच्या वरच्या भागातील रूमला शॉर्टसर्किटमुळे भर दुपारी आग लागून मोठे नुकसान झाले. या आगीत रूममधील सर्व साहित्य जळून खाक झाले असून अंदाजे ३ लाख ४९ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दुपारच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली. संबंधित रूममध्ये केशकर्तनालय तसेच ब्युटी पार्लरचे साहित्य ठेवण्यात आले होते. आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केल्याने रूममधील सर्व मशिनरी, खुर्च्या, समोरील काचा, लाईट फिटिंग तसेच इतर साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. त्यामुळे संपूर्ण साहित्य जळून खाक झाले.

घटनेची माहिती मिळताच पवार कुटुंबीयांसह ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांमुळे आग आटोक्यात आणण्यात आली. सुदैवाने आग लागली त्यावेळी रूममध्ये कोणीही उपस्थित नसल्याने मोठा अनर्थ टळला.

या घटनेत पवार यांचे अंदाजे ३ लाख ४९ हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. दरम्यान, तलाठी यांच्यामार्फत घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला आहे. भर दुपारी घडलेल्या या आगीच्या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.