युवतीच्या तक्रारीनंतर युवकाला बेड्या
इन्स्टाग्रामवरील चॅटिंगने झाली ओळख
कणकवली : सोशल मीडियावरील ओळखीचा गैरफायदा घेत एका युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे आश्वासन देत तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले आणि त्यानंतर लग्नास स्पष्ट नकार दिल्याचा गंभीर प्रकार कणकवली तालुक्यात उघडकीस आला आहे. या प्रकरणी वैभववाडी तालुक्यातील तिथवली येथील युवकाला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी २०२६ मध्ये इन्स्टाग्रामच्या माध्यमातून आरोपी आणि पीडित युवतीची ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि त्यानंतर प्रेमसंबंधात झाले. या काळात आरोपीने युवतीला लग्नाचे आश्वासन देऊन तिचा विश्वास संपादन केला. पीडित युवती मुंबई येथे खासगी नोकरी करते. एप्रिल महिन्यात ती गावी आली असताना आरोपीने तिला शहराजवळील एका लॉजमध्ये नेले. तेथे लग्नाचे आमिष देत तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. मात्र त्यानंतर युवतीने लग्नाबाबत विचारणा केली असता आरोपीने लग्नास नकार दिला. आपण फसवणुकीची शिकार झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडित युवतीने पोलिसांकडे धाव घेतली.
युवतीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ६४, ६९, ७५(२), ३५२ आणि ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे लग्नाचे खोटे आश्वासन देऊन लैंगिक संबंध प्रस्थापित करणे, महिलेचा छळ करणे आणि धमकी देण्यासंदर्भातील गंभीर तरतुदी या गुन्ह्यात लागू करण्यात आल्या आहेत. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत कणकवली पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा आरोपीला अटक केली. त्याला आज न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असून पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक वृषाली बर्गे करीत आहेत.










