Navi Mumbai: चरित्रावर संशय; पतीकडून पत्नी आणि सासूची हत्या, नेरुळ पोलिसांकडून आरोपीला अटक

 

नवी मुंबई : नेरुळ परिसरात पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नी आणि सासूची चाकूने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या दुहेरी हत्याकांडानंतर नेरुळ पोलिसांनी आरोपीला अटक केली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि त्याच्या पत्नीने सुमारे चार वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता. त्यांना एक मुलगाही आहे. विवाहानंतर हे दाम्पत्य नेरुळ परिसरात वास्तव्यास होते, तर आरोपीचे कुटुंब मुंबईत राहते. गेल्या वर्षभरापासून पत्नीच्या चारित्र्यावरून पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत असल्याची माहिती समोर आली आहे.

 

कौटुंबिक वाद वाढल्याने आरोपी काही काळापूर्वी आपल्या आई-वडिलांकडे राहायला गेला होता. मात्र, तो अधूनमधून पत्नीला भेटण्यासाठी नेरुळ येथे येत असे. प्रत्येक भेटीदरम्यान दोघांमध्ये वाद होत असल्याचेही पोलिस तपासात समोर आले आहे.

 

रविवारी आरोपी पत्नीच्या घरी आला असता किरकोळ कारणावरून दोघांमध्ये तीव्र शाब्दिक वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर संतापाच्या भरात आरोपीने चाकूने पत्नीवर सपासप वार केले. पत्नीला वाचवण्यासाठी धावून आलेल्या सासूवरही त्याने चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या दोन्ही महिलांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

 

घटनेची माहिती मिळताच नेरुळ पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेत अटक केली. सहाय्यक पोलीस आयुक्त मयूर भुजबल यांनी सांगितले की, प्राथमिक तपासात कौटुंबिक वाद आणि चारित्र्यावरून घेतलेला संशय हे हत्येमागील प्रमुख कारण असल्याचे दिसून येत आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.