JALGAON | चोपड्यात अवैध गौण खनिज वाहतुकीवर महसूल विभागाचा धडाका; दोन वाहने जप्त

 

जळगाव – चोपडा तालुक्यात अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्यांविरोधात महसूल विभागाने धडक कारवाई सुरू केली आहे. प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांच्या पथकाने संयुक्त कारवाई करत दोन वाहने जप्त केली आहेत.

 

गेल्या आठवडाभरात अमळनेर उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी आणि चोपडा तहसीलदार यांच्या पथकाने तालुक्यात विविध ठिकाणी अवैध गौण खनिज वाहतुकीवर कारवाया केल्या. या कारवाईदरम्यान एक टिप्पर आणि एक ट्रॅक्टर जप्त करण्यात आला. तसेच अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, काही प्रकरणांमध्ये संबंधितांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत.

 

तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या तीन महिन्यांत अवैध गौण खनिज वाहतूक करणारी एकूण १८ वाहने जप्त करण्यात आली आहेत.

 

याशिवाय, रेती घाटांचे परवाने रद्द झाल्यामुळे यापुढे आढळणारी सर्व रेती बेकायदेशीर समजली जाईल आणि अशा प्रकरणांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.