राजापूर | प्रतिनिधी : मुंबई गोवा महामार्गावर ओणी येथील पेट्रोलपंपासमोर दुचाकी व कार यांच्यात जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जियाऊलक रफिक अन्सारी (२७) रा. झारखंड हा जागीच ठार झाला आहे. मंगळवारी दुपारी ३ वाजण्याच्या दरम्यान हा अपघात घडला आहे.
जियाऊलक अन्सारी हा आपली दुचाकी घेऊन लांजाकडून राजापूरकडे येत असताना पेट्रोलपंपातुन बाहेर पडणाऱ्या कारवर धडकल्याने हा अपघात झाला. कार चालक अचानक पेट्रोल पंपातुन बाहेर मुख्य रोडवर महामार्गावर आल्याने हा दुचाकीस्वार कारवर धडकून हा अपघात झाला आहे. या अपघातात अन्सारी याला गंभीर दुखापत झाल्याने तो जागीच ठार झाला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. या अपघाताची माहिती मिळताच तात्काळ स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत मदत केली. पोलीस व स्थानिकांनी जियाऊलक याला तात्काळ राजापूर ग्रामीण रूग्रणालयात दाखल केले मात्र तत्पुर्वीच त्याचा मृत्यु झाला होता. जियाऊलक अन्सारी हा झारखंड येथील रहिवाशी असून तो राजापूरात एका बिल्डींग कंट्रक्नशची कामे करणाऱ्या ठेकेदाराकडे काम करत होता.
या अपघाताची माहिती मिळताच राजापूर पोलीस स्थानकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. रणदिवे, उपनिरीक्षक सुधीर उबाळे, मोबीन शेख, यांसह कर्मचारी महेश जगताप यांसह सहकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. तर ओणी पोलीस पाटील संजय लिंगायत, भाजपाचे युवा कार्यकर्ते समिर शिंदे तसेच आयान वाघू, गणेश लाड, विजय सुवरे यांनीही घटनास्थळी धाव घेत पोलीसांना सहकार्य केले. या प्रकरणी पोलीसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत अपघाताची नोंद केली आहे.
या प्रकरणी संबधित ठेकेदाराला याबाबत माहिती देण्यात आली असून मृत्युमुखी जियाऊलक अन्सारी याचा मृतदेह राजापूर ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.











