ड्रोन उडवणाऱ्या कर्मचाऱ्यांना ग्रामस्थांनी रोखले
सावंतवाडी पोलिसात तक्रार : गुन्हा दाखल

सावंतवाडी । प्रतिनिधी :निसर्गरम्य आजगाव दशक्रोशीत प्रस्तावित मायनिंग प्रकल्पाचा वाद पुन्हा एकदा पेटला आहे. ग्रामसभेचा तीव्र विरोधाचा ठराव असतानाही, ग्रामस्थांना कोणतीही पूर्वकल्पना न देता एका मायनिंग कंपनीकडून सोमवारी सायंकाळी अत्याधुनिक ड्रोनद्वारे जमिनीचे सर्वेक्षण सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या शेकडो ग्रामस्थांनी ड्रोन चालवणाऱ्या कर्मचाऱ्यांना जाब विचारत थेट मंदिरात आणले. यामुळे आजगाव मंदिर परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून सावंतवाडी आणि वेंगुर्ला पोलिसांना अतिरिक्त कुमकसह घटनास्थळी पाचारण करावे लागले. रात्री उशिरापर्यंत हा हायव्होल्टेज ड्रामा सुरू होता. त्यानंतर आज सकाळी या विरोधात सावंतवाडी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आजगाव आणि परिसरातील गावांमध्ये मायनिंग प्रकल्प प्रस्तावित असून, त्याला स्थानिक जनतेचा संघटित विरोध आहे. सोमवारी सायंकाळी दाखवरे परिसरामध्ये आकाशात अचानक एक अत्याधुनिक ड्रोन घोंगावताना काही ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. ही बातमी वाऱ्यासारखी गावात पसरताच आक्रमक ग्रामस्थांनी ड्रोन ऑपरेटरचा शोध सुरू केला. अखेर सदरचा ड्रोन मळेवाड परिसरातील एका खाजगी रिसॉर्टमधून ऑपरेट केला जात असल्याचे उघड झाले. ग्रामस्थांनी तातडीने तेथे धडक मारत संबंधित कंपनीच्या कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले आणि थेट आजगाव येथील श्री देव वेतोबा मंदिरात आणले.
कर्मचाऱ्यांना मंदिरात आणल्याची माहिती मिळताच सुमारे ४०० हून अधिक ग्रामस्थ गोळा झाले. तणावाची माहिती मिळताच वेंगुर्ला आणि सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संतप्त ग्रामस्थांना शांत करण्याचा प्रयत्न केला, मात्र, आमच्या गावात मायनिंगसारखा विनाशकारी प्रकल्प नको असताना ही बळजबरी का? असा सवाल करत ग्रामस्थांनी पोलिसांसमोरच तीव्र भावना व्यक्त केल्या.
घटनेचे गांभीर्य ओळखून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब, जिल्हा परिषद सदस्य सुदन कवठणकर, संजय गावडे, पंचायत समितीचे माजी उपसभापती सिद्धेश परब, मळेवाडचे उपसरपंच हेमंत मराठे, सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल प्रभू आजगावकर आणि आजगावचे प्रभारी सरपंच सुशील कामतेकर यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित झाले.
उपस्थित ग्रामस्थांनी कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. “या ड्रोन सर्वेक्षणाला कोणी परवानगी दिली? आमच्या जमिनी, घरे आणि मंदिरांबाबत निर्णय घेताना आम्हाला विश्वासात का घेतले नाही? या सर्व प्रकरणामागे कोणाचे हितसंबंध आहेत?” असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. अखेर ॲड. स्वप्नील आजगावकर यांनी मध्यस्थी करत ग्रामस्थांना शांत केले आणि सदरील घटनेची लिखित प्रत सर्वांसमक्ष लिहून घेतली. यानंतर, मायनिंगचा हा भस्मासुर गावातून हद्दपार व्हावा यासाठी सर्व ग्रामस्थांनी एकजूट दाखवत ग्रामदैवतासमोर नतमस्तक होऊन सामूहिक गार्हाणे घातले.
हा सर्व प्रकार रात्री दोन वाजेपर्यंत सुरू होता. ग्रामस्थ शांत झाल्यानंतर पोलिसांनी संबंधित कंपनीच्या कर्मचाऱ्यांना सुरक्षेच्या कारणास्तव ताब्यात घेत तेथून हलवले. सध्या तरी येथील संभाव्य संघर्ष टळला असला, तरी या ड्रोन सर्वेक्षणामुळे मायनिंगविरोधातील चीड अधिकच तीव्र झाली असून, आगामी काळात हा संघर्ष आणखी उग्र होण्याची चिन्हे आहेत.
पोलिसात तक्रार : गुन्हा दाखल
दरम्यान रात्री झालेल्या या प्रकारानंतर मंगळवारी सकाळी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सावंतवाडी पोलिसात दिलेल्या तक्रारीनंतर ४० ते ५० जणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास सावंतवाडी पोलीस करीत आहेत.
*आजगाव ग्रामस्थांच्या पालकमंत्री पाठीशी : संजू परब*
आजगाव येथे रात्री पोलिस प्रशासन आणि ग्रामस्थांत सुसंवाद घडला असून संबंधित कंपनीच्या माणसांना ग्रामस्थांनी पोलिसांच्या स्वाधीन केले. यात संबंधितांकडून कोणतीही मारहाण न झाल्याचे तसेच त्रास न दिल्याचा जबाब दिला. मात्र, आज सावंतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आलेत. मात्र, शिवसेना पक्ष तसेच पालकमंत्री नितेश राणे ग्रामस्थांच्या पाठीशी उभे आहेत असा शब्द शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी दिला. ते म्हणाले, ग्रामस्थांवर दाखल झालेल्या गुन्ह्यांचा शिवसेना निषेध करत आहे. आम्ही ग्रामस्थांच्या पाठीशी असून पालकमंत्री नितेश राणे यांच्याशी देखील माझं बोलणं झालं आहे. ते देखील ग्रामस्थांच्या बाजूने उभे राहणार असल्याचा शब्द त्यांनी दिला आहे अशी माहिती श्री. परब यांनी देत गुन्हे दाखल करणाऱ्यांचा निषेध नोंदवला.












