ग्रामस्थांच्या सहकार्याने निवतीबंदर रस्त्याचे काम अखेर मार्गी…

वेंगुर्ले : प्रतिनिधी

गेली बरीच वर्षे अपूर्णावस्थेत असलेल्या व पर्यटनदृष्ट्या महत्व पूर्ण असलेल्या निवतीबंदर जे. टी. पर्यंतच्या १ कि. मी. लांबीच्या बंदर विभागाच्या अखत्यारीतील रस्त्याला मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री ना. नितेश राणे यांनी मंजुरी दिल्यावर ग्रामस्थांसमवेत सरपंच अवधूत रेगे, ग्रामपंचायत अधिकारी शरद शिंदे, उपसरपंच प्रजोत मेतर यांच्या सहकार्याने १ कि. मी. लांबीच्या व ६ मी. रुन्दीच्या रस्त्याची मोजणी पूर्ण केली. यामध्ये येणारी अतिक्रमणे येत्या चार पाच दिवसात हटवण्याची ग्रामस्थानी ग्वाही दिली. त्यामुळे पर्यटन दृष्ट्या महत्वपूर्ण असलेल्या या रस्त्याचे काम अखेर मार्गी लागले आहे.

या रस्त्यावर असलेली लोकांची अतिक्रमणे हा रस्ता कामातील प्रमुख अडतळा होता. त्यामुळे सुमारे १ कोटी ३० लाख रूपये खर्चाचे टेंडर मंजूर
होऊनही प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली नव्हती. या साठी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. सरपंच अवधूत रेगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभेला बंदर निरीक्षक अनंत गोसावी, बंदर विभागाचे नार्वेकर, उपसरपंच
प्रजोत मेतर, ग्रामविकास अधिकारी शरद शिंदे, सुधीर मेतर, रमाकांत परब, प्रल्हाद मेतर, श्रीधर मेतर, कमलेश मेतर, मनिष मेतर, योगेश मेतर, तृप्ती काम्बळी, सौ. निवतकर, गंगाराम सारंग, पान्डुरंग सारंग व ग्रामस्थ उपस्थित होते.
या रस्त्यासाठी निधी मंजूर केल्याबद्दल मत्स्यव्यवसाय व बंदर विकासमंत्री ना. नितेश राणे, आमदार दीपकभाई केसरकर यांचे सरपंच व ग्रामस्थानी आभार मानले. बंदर निरीक्षक अनंत गोसावी यांनी
ग्रामस्थाना रस्त्याच्या कामा बाबत माहिती दिली आणि ग्रामस्थांच्या शंकाचे
निरसन केले. त्यामुळे या रस्त्याचा प्रश्न आता मार्गी लागला आहे.