खेड: शिवाजीनगर जाड्यालवाडीत भंगार गोदामाला भीषण आग

अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

खेड (प्रतिनिधी) : खेड शहरातील शिवाजीनगर जाड्यालवाडी परिसरात मंगळवारी सायंकाळी भंगार गोदामातील कचऱ्याच्या ढिगाऱ्याला अचानक मोठ्या प्रमाणात आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सायंकाळी सुमारे ५.४४ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. आगीची माहिती मिळताच खेड नगरपरिषदेचा पाण्याचा टँकर आणि अग्निशमन विभागाचे वाहन तातडीने घटनास्थळी दाखल झाले.


भंगार गोदामातील कचऱ्याच्या ढिगाऱ्याने पेट घेतल्यामुळे मोठ्या प्रमाणात धूर निर्माण झाला होता. आग वाढून आसपासच्या परिसराला धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन अग्निशमन दलाने त्वरित बचावकार्य सुरू केले. नगरपरिषदेच्या पाण्याच्या टँकरच्या मदतीने आणि अग्निशमन विभागाच्या समन्वयातून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. त्यामुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला.
सदर जागेचे मालक श्री. जाड्याल असल्याची माहिती नगरपरिषद प्रशासनाकडून देण्यात आली. आगीच्या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची नोंद नसून आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
या बचावकार्यात खेड नगरपरिषदेच्या पाणी टँकरचे वाहन चालक बंटी तांबे तसेच प्रशांत जाधव यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. अग्निशमन विभागाकडून फायरमन शाम देवळेकर, दीपक देवळेकर, वाहन चालक गजानन जाधव तसेच सहायक फायरमन प्रणय रसाल, प्रणव घाग, जयेश पवार आणि सुरेश शिगवण यांनी अथक परिश्रम घेत आगीवर नियंत्रण मिळवले. अग्निशमन दलाच्या तत्पर कारवाईमुळे आग परिसरात पसरू न देता वेळेत विझवण्यात यश आले.