नांदेड : महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत आज नांदेड दौऱ्यावर आले असता त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना त्यांनी संजय राऊत यांच्यावर टीका करत, “संजय राऊत प्रसारमाध्यमांशी बोलतात म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे गट जिवंत असल्याचे भासवले जात आहे,” असे म्हटले.
तसेच, ‘ऑपरेशन टायगर’ अंतर्गत दोन खासदार दिल्लीकडे रवाना झाल्यानंतर त्यांना १५ कोटी रुपयांची रक्कम देण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना उदय सामंत म्हणाले की, “यापूर्वीही आमच्यावर अशा प्रकारचे आरोप करण्यात आले आहेत. मात्र, त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही.”
ते पुढे म्हणाले, “विधानसभा, महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जनतेने मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला आहे. त्यामुळे काही खासदार शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी येत असतील, तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही.”
“संध्याकाळपर्यंत याबाबतचे चित्र स्पष्ट होईल. मलादेखील याची उत्सुकता आहे,” असेही उदय सामंत यांनी सांगितले.












