अध्यक्ष प्रमोद कामत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर यांची उपस्थिती.
सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी
दिवाळीचा उत्साह, फराळाचा दरवळ आणि महिला बचत गटांच्या स्वावलंबनाचा आनंदी सोहळा… अशा उत्साहपूर्ण वातावरणात सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे प्रवेशद्वार सोमवारी दिवाळीमय झाले. दरवर्षीप्रमाणे यंदाही जिल्ह्यातील महिला बचत गटांनी तयार केलेल्या दिवाळी फराळाच्या विक्रीला जिल्हा परिषद प्रवेशद्वारावर प्रारंभ झाला. आकाशकंदील, पणत्या, आकर्षक सजावट आणि चविष्ट फराळाच्या विविध पदार्थांनी संपूर्ण परिसराला दिवाळी बाजाराचे स्वरूप प्राप्त झाले. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर यांनी खास उपस्थित राहून महिला बचत गटांचे स्वागत केले आणि त्यांच्या उपक्रमाला प्रोत्साहन दिले. जिल्ह्यातील स्वयं-सहाय्यता समूहांनी उत्पादित केलेले विविध खाद्यपदार्थ आणि दिवाळी फराळ २ ते ५ नोव्हेंबर या कालावधीत विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या महोत्सवात जिल्ह्यातील विविध महिला बचत गटांनी सहभाग घेतला असून लाडू, करंज्या, चकली, चिवडा, पोहे यांसह विविध पारंपरिक फराळाचे पदार्थ ग्राहकांच्या पसंतीसाठी मांडण्यात आले आहेत. याशिवाय महिलांनी स्वतः तयार केलेल्या मेणबत्त्या, पणत्या, आकाशकंदील आणि अन्य आकर्षक वस्तूही विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत.
महिला बचत गटांनी केवळ फराळ तयार करण्यापुरते मर्यादित न राहता आपल्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या कष्टांना आणि कौशल्याला योग्य मोबदला मिळावा, तसेच ग्रामीण महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याची संधी मिळावी, या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी बोलताना जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी जिल्ह्यातील सर्व अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी या महोत्सवाला भेट देऊन महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या खाद्यपदार्थांची व वस्तूंची खरेदी करावी, असे आवाहन केले. स्थानिक महिलांच्या मेहनतीतून तयार झालेल्या उत्पादनांना प्राधान्य दिल्यास त्यांच्या आर्थिक स्वावलंबनाला मोठे बळ मिळेल, असेही त्यांनी नमूद केले.
जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी सर्व स्टॉलना भेट देत उत्पादनांची माहिती घेतली. महिला बचत गटांच्या प्रतिनिधींशी संवाद साधत त्यांच्या उपक्रमाचे कौतुक केले. या महोत्सवाच्या माध्यमातून दिवाळीच्या खरेदीसोबतच ग्रामीण महिलांच्या कष्टांना सन्मान आणि त्यांच्या स्वावलंबनाला प्रोत्साहन देण्याची संधी उपलब्ध झाली आहे.













