स्वच्छ व सुंदर राजापूरसाठी शहरवासीयांनी सहकार्य करावे

कचरा वर्गीकरणाबाबत राजापूर नगरपरिषदेचे नागरिकांना आवाहन

राजापूर | प्रतिनिधी राजापूर शहर स्वच्छ, सुंदर आणि निरोगी ठेवण्यासाठी नागरिकांनी घरगुती कचऱ्याचे योग्य प्रकारे वर्गीकरण करूनच घंटागाडीत द्यावे, असे आवाहन राजापूर नगरपरिषदेने केले आहे. शहरातील स्वच्छता व्यवस्था अधिक प्रभावी करण्याबरोबरच सफाई कर्मचाऱ्यांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्याच्या उद्देशाने हे आवाहन करण्यात आले आहे.
नगरपरिषदेने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात नागरिकांना ओला कचरा, सुका कचरा, घातक कचरा आणि सॅनिटरी वेस्ट यांचे स्वतंत्र वर्गीकरण करण्याचे आवाहन केले आहे. कचऱ्याचे योग्य वर्गीकरण झाल्यास घनकचरा प्रकल्पात त्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करणे सुलभ होते. तसेच कचरा हाताळणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना जखमा, संसर्गजन्य आजार आणि इतर आरोग्यविषयक धोके टाळण्यास मदत होते.

विशेषतः सॅनिटरी वेस्ट, काच, ब्लेड, सुई, औषधांचे अवशेष तसेच इतर घातक वस्तू स्वतंत्रपणे पॅक करून देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यामुळे सफाई कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचे रक्षण होणार असल्याचे नगरपरिषदेने स्पष्ट केले आहे.तसेच कोणत्याही परिस्थितीत कचरा उघड्यावर, रस्त्याच्या कडेला, नदीपात्रात, नाल्यांमध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणी टाकू नये, असेही आवाहन करण्यात आले आहे. अशा प्रकारे टाकलेला कचरा पर्यावरणाला हानी पोहोचविण्यासह जलप्रदूषण आणि रोगराई वाढण्यास कारणीभूत ठरू शकतो, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

“माझा कचरा, माझी जबाबदारी” हे ब्रीदवाक्य अंगीकारून नागरिकांनी स्वच्छता मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन राजापूर नगरपरिषदेने केले आहे. नागरिकांच्या सहकार्यामुळेच स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी राजापूर घडविणे शक्य होईल, असा विश्वास नगरपरिषदेने व्यक्त केला आहे.

“स्वच्छ शहर – सुंदर शहर – निरोगी शहर” या संकल्पनेला साकार करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने कचरा वर्गीकरणाची सवय अंगीकारणे काळाची गरज असल्याचेही नगरपरिषदेने म्हटले आहे.