Raigad: रोह्यात प्रेमसंबंधाचा दुर्दैवी शेवट; प्रियसीची हत्या करून प्रियकराची आत्महत्या

रायगड : रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात घडलेल्या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. प्रियकर रोहित पाटील आणि प्रेयसी तन्वी ताडकर या दोघांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. दोघेही रोहा तालुक्यातील निडी गावचे रहिवासी होते.

 

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईला स्थलांतरित झालेल्या एका कुटुंबाच्या घराची साफसफाई करण्यासाठी दोघे गेले होते. यावेळी प्रेमसंबंधातून त्यांच्यामध्ये शाब्दिक वाद झाल्याचे समोर आले असून, त्यानंतर प्रियकराने प्रियसीची हत्या करून स्वतःही गळफास घेतल्याची दुर्दैवी घटना घडली. ही घटना १५ जूनच्या रात्री घडल्याचे सांगण्यात येत आहे.

 

 

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी प्रसाद गोकुळे, पोलीस निरीक्षक मारुती पाटील आणि त्यांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी रोहा उपजिल्हा रुग्णालयात पाठवले आहेत.

या प्रकरणाचा पुढील तपास रोहा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती पाटील आणि त्यांचे पथक करत आहे. तपासानंतरच मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.