Buldhana: अन्न-पाण्याच्या शोधात अस्वल थेट नागरी वस्तीत; उघड्यावर अन्न टाकल्याने वाढला वावर

बुलढाणा : बुलढाणा शहराच्या टोकाला व जंगलालगत असलेल्या म्हाडा कॉलनी परिसरात वन्यप्राण्यांचा वावर वारंवार पाहायला मिळतो. मात्र, आता अन्न-पाण्याच्या शोधात एक अस्वल थेट वस्तीत शिरल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली आहे.

 

स्थानिक नागरिकांकडून उघड्यावर शिळे अन्न टाकले जात असल्याने ते खाण्यासाठी अस्वल, बिबट्या यांसारखे वन्यप्राणी वस्तीकडे आकर्षित होत आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वन्यप्राण्यांच्या हल्ल्याची शक्यता देखील वाढली आहे.

 

अनुचित घटना टाळण्यासाठी नागरिकांनी उघड्यावर अन्न टाकू नये तसेच रात्रीच्या वेळी परिसरात फिरताना विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन नगरपालिका प्रशासन आणि वन विभागाकडून करण्यात आले आहे.