नागरिकांची उडाली तारांबळ, नागाला नैसर्गिक अधिवासात आले सोडण्यात
लांजा | प्रतिनिधी : लांजा शहरात दुकानात शिरणाऱ्या एकाच जातीच्या जहाल विषारी नागाला सर्पमित्राने पकडले आणि त्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. सोमवारी १४ ऑगस्ट रोजी सकाळी ११.३० वाजता शहरातील कोत्रे हाॅटेल नजीक ही घटना घडली.
सोमवारी १४ ऑगस्ट रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास कनावजे कॉम्प्लेक्स कडून मुंबई गोवा महामार्ग ओलांडून सदरचा एकाश जातीचा हा विषारी नाग लांजा कोत्रे हॉटेल नजीकच्या जय महाराष्ट्र पान स्टॉलकडे आला. हा नाग दुकानात शिरण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे नागाला पाहिल्यानंतर येथील दुकान व्यावसायिक तसेच नागरिकांची भितीने प्रचंड तारांबळ उडाली होती. त्यानंतर सर्पमित्र अमेय कांबळे याला बोलावण्यात आले. त्यानंतर सर्पमित्र कांबळे यांनी विषारी नागाला पकडले. सात फूट लांब आणि पूर्ण वाढ झालेला हा विषारी नाग होता. तो वेळीच नागरिकांच्या दृष्टीस पडल्याने संभाव्य दुर्घटना टळली. मात्र त्याला पकडल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला. या पकडलेल्या नागाला सर्पमित्र अमेय कांबळे यांनी वाकेड येथील नैसर्गिक अधिवासात सोडून दिले.












