गुहागर | प्रतिनिधी
समुद्रकिनार्यावरील तोडलेल्या सॉलिड (फ्लोटिंग) जेटीची आमदार प्रमोद जठार यांच्याकडून पाहणी करण्यात आली. आमदार प्रमोद जठार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी गुहागर तालुक्याच्या वतीने मंगळवारी सायंकाळी गुहागर समुद्रकिनारी स्वच्छता अभियान राबविण्यात आले होते. स्वच्छता अभियान झाल्यानंतर आमदार प्रमोद जठार यांनी गुहागर समुद्रकिनार्यावरील तोडलेल्या सॉलिड जेटीची पाहणी केली. यावेळी भाजपाचे उत्तर जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, जिल्हा सरचिटणीस व उपसभापती निलेश सुर्वे, भाजपा तालुकाध्यक्ष अभय भाटकर, गुहागर नगरपंचायत नगराध्यक्ष नीता मालप व सर्व नगरसेवक तसेच भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.
गुहागर समुद्रकिनारी पतन अभियंता रत्नागिरी विभाग पर्यटन विकास महामंडळ अंतर्गत बारावा वित्त आयोग सागरी किनारी व सृष्टी पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत तात्कालीन नगर विकास राज्यमंत्री व विद्यमान आमदार भास्कर जाधव यांच्या प्रयत्नाने उभारण्यात आलेल्या सुमारे ९६ लाख खर्च झालेली सॉलिड (फ्लोटिंग) जेटी उभारण्यात आलेली ही जेटी काढून टाकावी असा निकाल राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण पुणे यांनी दिला होता. पतन उपविभागाच्या वतीने हे तोडण्यात आली होती. मात्र, अजूनही तिचे अवशेष (मोठे दगड व तुटलेले बांधकाम) किनार्यावर पडून आहेत. या सॉलिड जेटीचे पुढील टोक समुद्र पाण्याशी जोडलेले असल्याने अनेक पर्यटक आपल्या लहान मुलांसह जेटीवर जाऊन समुद्र लाटांशी खेळताना दिसत आहेत.
विशेष म्हणजे समुद्र पाण्यात असलेल्या जेटीच्या दोन्ही बाजूने कठडेच नसल्याने अशा धोकादायक जेटीवर पर्यटक जाऊन समुद्र लाटांशी खेळताना दिसून येत आहेत. यामध्ये काही महिला पर्यटक आपल्या मुलांबरोबर जेटीवर सेल्फी काढताना दिसत आहेत. दरवर्षी गुहागरमध्ये पर्यटक मोठ्या प्रमाणात गुहागरमध्ये येतात व येथील निसर्गसौंदर्याचा आनंद लुटतात. समुद्रात मनसोक्त डुंबतात. त्यानंतर या जागेवर जाऊन फोटो काढण्याचा आनंद घेत असतात. त्यामुळे गुहागर समुद्रकिनारच्या या धोकादायक जेटीचा प्रश्न आता प्रकर्षाने समोर आला आहे. स्थानिक प्रशासनाने या जेटीवर पर्यटकांनी जाऊ नये म्हणून कायमची उपाययोजना करणे गरजेचे आहे अशी मागणी पर्यटनप्रेमींनी केली आहे.












