आमदार निलेश राणे यांच्या हस्ते मालवण शहरातील १३ कोटींच्या विकासकामांचे उद्या भूमिपूजन 

नगराध्यक्षा ममता वराडकर यांची माहिती 

मालवण | प्रतिनिधी : आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून मालवण नगरपरिषद क्षेत्रात विविध विकासकामांचा धडाका सुरूच आहे. शहरातील महत्त्वपूर्ण पर्यटन व सांस्कृतिक स्थळांच्या सुशोभिकरणासाठी सुमारे १३ कोटी रुपयांच्या निधीतून होणाऱ्या विविध विकासकामांचा भूमिपूजन सोहळा गुरुवार १८ जून रोजी आयोजित करण्यात आला आहे. या विकासकामांचा शुभारंभ आमदार निलेश राणे यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी दिली आहे.

शहरातील पर्यटन आणि नागरिक सोयी-सुविधांना चालना देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर करून घेतला असून, या अंतर्गत तीन प्रमुख प्रकल्पांचे भूमिपूजन एकाच दिवशी केले जाणार आहे. यात मालवण नगरपरिषद रॉक गार्डन सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन (1 कोटी निधी), मालवण नगरपरिषद गवंडीवाडा येथे नमो उद्यान सुशोभीकरण भूमिपूजन (1 कोटी निधी), मालवण शहरातील सांस्कृतिक केंद्र असलेले मामा वरेरकर नाट्यगृह सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन (निधी 11 कोटी) यां कामांचे भूमिपूजन होणार आहे.

 

मालवण शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या या महत्त्वाकांक्षी १३ कोटींच्या विकासकामांच्या शुभारंभ प्रसंगी आजी-माजी लोकप्रतिनिधी, नागरिक, व्यापारी यांनी उपस्थित राहावे. असे आवाहन नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी केले आहे.