गुहागर तालुक्यातील आरोग्यसेवकाचा आदर्श, दरवर्षी विविध उपक्रम राबविण्याचा संकल्प
गुहागर | प्रतिनिधी : गुहागर तालुक्यातील एका आरोग्यसेवकाने एक वेगळा आदर्श घालून दिला आहे. आपल्या वाढदिनी तालुक्यातील जिल्हापरिषदेच्या मराठी शाळांमधील ७०० विद्यार्थ्यांना स्कूल बँग वाटप केले. दत्ता मुळे असे या
आरोग्यसेवकाचे नाव असून त्याच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
या उपक्रमाचा शुभारंभ तालुक्यातील वडद, गिमवी, तळवली या शाळांमधून करण्यात आला. अखिल भारतीय समुदाय आरोग्यात अधिकारी संघटनेचे राज्याध्यक्ष दत्ता मुळे यांनी स्वतःच्या वाढदिनी ही एक संकल्पना राबविली. आजकाल सर्व पालकांचा कल हा मराठी शाळा वगळून इंग्रजी शाळेत घालण्याकडे आहे. परिणामी जिल्हापरिषद शाळेमध्ये मुलांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे आपल्या छोट्याशा प्रयत्नाने असा उपक्रम राबविण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. दरवर्षी ते असे लहान-मोठे सामाजिक उपक्रम राबवत असतात. दत्ता मुळे यांना त्यांचे काही समुदाय आरोग्य अधिकारीदेखील या उपक्रमात सहकार्य करत असतात.












