सावंतवाडी पोलिसांकडून ४३ हजार रुपये ‘होल्ड’ करण्यात यश
सावंतवाडी:
मोबाईलवर अनोळखी नंबरवरून व्हॉट्सॲप व्हॉइस कॉल करून, “एका मुलीसोबतचा तुझा व्हिडिओ आमच्याकडे आहे, तो सोशल मीडियावर अपलोड करू आणि तुझ्या कुटुंबाला अटक करू,” अशी धमकी देऊन सातार्डा परिसरातील एका युवकाला तब्बल ७८ हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायदा (I.T. Act) आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी तातडीने पावले उचलत या रक्कमेतील ४३ हजार रुपयांचा व्यवहार ‘होल्ड’ करण्यात यश मिळवले आहे.
याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की, सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सातार्डा परिसरातील एका युवकाला काही दिवसांपूर्वी एका अनोळखी नंबरवरून व्हॉट्सॲपवर व्हॉइस कॉल आला. फोन करणाऱ्या अज्ञात व्यक्तीने, “एका मुलीने तुला कॉल केला होता, त्याचा आणि तुझा व्हिडिओ तिच्याकडे आहे. तो व्हिडिओ ती आता सोशल मीडियावर अपलोड करणार आहे. यामुळे तुझ्या कुटुंबाला पोलीस अटक करतील,” अशी खोटी भीती घालण्यास सुरुवात केली. या अचानक आलेल्या धमकीमुळे सदर तरुण प्रचंड घाबरून गेला. याच भीतीचा फायदा घेत समोरील अज्ञात व्यक्तीने वेळोवेळी कॉल करून पैशांची मागणी केली. अब्रू जाण्याच्या आणि पोलिसांच्या भीतीपोटी तरुणाने वेगवेगळ्या व्यवहारांद्वारे एकूण ७८,००० रुपये त्या अज्ञात व्यक्तीच्या खात्यावर पाठवले.
सतत होणाऱ्या पैशांच्या मागणीमुळे अखेर आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर या तरुणाने सावंतवाडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आणि सायबर सेलच्या मदतीने तांत्रिक तपास सुरू केला. पोलिसांच्या तत्परतेमुळे फसवणूक झालेल्या एकूण रक्कमेपैकी ४३,००० रुपयांचा ऑनलाईन व्यवहार बँक पातळीवर ‘होल्ड’ (गोठवण्यात) करण्यात पोलिसांना यश आले आहे, ज्यामुळे पीडित तरुणाचे मोठे नुकसान टळले. सदर गुन्ह्याचा पुढील सखोल तपास सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण हे करीत आहेत.
पोलीस प्रशासनाचे नागरिकांना आवाहन:
या घटनेच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी पोलिसांतर्फे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. “कोणीही व्यक्ती फोन किंवा मेसेज करून आपण पोलीस, जज, सीबीआय (CBI) किंवा सीआयडी (CID) अधिकारी असल्याचे सांगत असेल आणि पैशांची मागणी किंवा धमकी देत असेल, तर त्यावर अजिबात विश्वास ठेवू नका. अशा धमक्यांना घाबरून जाऊन कोणालाही ऑनलाईन पैसे पाठवू नका. अशी कोणतीही शंका किंवा तक्रार असल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा,” असे आवाहन पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी केले आहे.











