दापोली कस्टम्सची मोठी कारवाई
रत्नागिरी: मुंबई-गोवा महामार्गावरील खेड रेल्वे स्थानकाजवळ दापोली सीमाशुल्क (कस्टम्स) विभागाच्या पथकाने मध्यरात्रीच्या सुमारास एक मोठी कारवाई केली आहे. वन्यजीव (संरक्षण) कायदा, १९७२ चे उल्लंघन करून ‘अंबरग्रीस’ (व्हेल माशाची उलटी) या अत्यंत महागड्या आणि प्रतिबंधित पदार्थाची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या दोघांना कस्टम्सच्या पथकाने रंगेहात पकडले. या कारवाईत त्यांच्याकडून तब्बल १० किलोहून अधिक वजनाचे अंबरग्रीस जप्त करण्यात आले असून, गुन्ह्यात वापरलेली रेनॉल्ट क्विड कारही ताब्यात घेण्यात आली आहे. १५ आणि १६ जून २०२६ च्या दरम्यानच्या रात्री सव्वातीन ते साडेतीनच्या सुमारास ही धडक कारवाई करण्यात आली.
दापोली सीमाशुल्क विभागाच्या गुप्तवार्ता पथकाला काही लोक अंबरग्रीसची बेकायदेशीर विक्री आणि वाहतूक करण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गावरून जाणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. या गुप्त माहितीच्या आधारे अधीक्षक अतुल पोतदार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने खेड रेल्वे स्थानकाजवळ सापळा रचला. संशयास्पद रेनॉल्ट क्विड कार तिथे येताच अधिकाऱ्यांनी ती अडवून झडती घेतली. यावेळी कारमध्ये बेकायदेशीरपणे लपवून ठेवलेले १० किलोपेक्षा जास्त वजनाचे अंबरग्रीस आढळून आले. वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार स्पर्म व्हेल माशाशी संबंधित कोणत्याही पदार्थाची खरेदी, विक्री किंवा वाहतूक करण्यावर पूर्णपणे बंदी असल्याने, अधिकाऱ्यांनी तात्काळ हा मुद्देमाल जप्त करून कारमधील दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले.
अंबरग्रीस हा पदार्थ वन्यजीव (संरक्षण) कायदा, १९७२ च्या अनुसूची-१ मधील नोंद क्र. १६९ अंतर्गत प्रतिबंधित असल्याने ही संपूर्ण जप्ती कायदेशीर प्रक्रियेनुसार करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना खेड येथील माननीय न्यायदंडाधिकारी (JMFC) यांच्या न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना ३० जून २०२६ पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्याचे आदेश दिले आहेत. तसेच जप्त केलेले अंबरग्रीस पुढील कायदेशीर कारवाईसाठी अधिकृत वनविभागाच्या ताब्यात देण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.
सीमाशुल्क विभागाने या निमित्ताने नागरिकांना आवाहन केले आहे की, रत्नागिरी जिल्हा किंवा परिसरात कोणत्याही प्रकारची तस्करी अथवा संशयास्पद हालचाली आढळल्यास त्वरित कस्टम्स विभागाशी संपर्क साधावा. माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव व ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल, तसेच विभागाच्या धोरणानुसार योग्य माहिती देणाऱ्यास रोख बक्षीस देखील दिले जाईल, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
ही यशस्वी कारवाई अधीक्षक (प्रतिबंधात्मक आणि गुप्तवार्ता) श्री. अतुल पोतदार यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक श्रीमती कविता नायर, श्री. रविकांत, निरीक्षक श्री. प्रतीक अहलावत, श्री. धीरज ओझा, श्री. नितेश शर्मा, मुख्य हवालदार सुहास विलणकर, हवालदार करण मेहता, गौरव मौर्य, प्रशांत खोब्रागडे, सुकाणी अमित पालशेतकर आणि लाँच मेकॅनिक किरण सागवेकर यांच्या पथकाने केली.












