वेंगुर्ले शहरातील गटारांची कामे अयोग्य पद्धतीने : न.प.सर्वसाधारण सभेत नगरसेवकांची नाराजी…

अपूर्ण कामांची बिल काढू नयेत : नगराध्यक्ष दिलीप गिरप

वेंगुर्ले : दाजी नाईक
वेंगुर्ले शहरातील गेल्या चार वर्षात झालेली गटारांची कामे व सध्या करण्यात आलेली गटारांची कामे योग्य पद्धतीने होत नसल्याने नागरिकांना विविध समस्याच निर्माण होणार आहेत. नगराध्यक्ष यांच्या घराशेजारील गटारासह अनेक गटारांची कामे अपूर्ण आहेत. सर्वच नगरसेवकांनी या गटारांच्या कामाबाबत नाराजी व्यक्त केली. त्यामुळे ही सर्व कामे पाऊस सुरू होण्या पूर्वी नीट करा. जी कामे अपूर्ण असतील त्या कामांची बिल काढू नयेत अशा सूचना आजच्या वेंगुर्ले नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी दिल्या.

वेंगुर्ले नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा बुधवार १७ जून रोजी सायंकाळी नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप यांच्या अध्यक्षतेखाली श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात संपन्न झाली. यावेळी व्यासपीठावर मुख्याधिकारी हेमंत किरुळकर, उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, सभापती प्रणव वायंगणकर, सचिन शेट्ये,
गौरी माईंणकर, गौरी मराठे,
उपसभापती रिया केरकर ,
नगरसेवक सदानंद गिरप, रवींद्र शिरसाट, सुधीर पालयेकर, प्रीतम सावंत, संदेश निकम, विनय नेरुरकर, दाजी परब, प्रशांत आपटे, नगरसेविका अँड. सुषमा प्रभूखानोलकर, शीतल आंगचेकर, आकांक्षा परब, समिधा रेडकर, लीना म्हापणकर, काजल कुबल, सुमन निकम तसेच न. प. विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते.

सभेच्या प्रारंभी आमदार दीपक केसरकर यांची सिंधुरत्न योजना उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल संदेश निकम यांनी अभिनंदनचा ठराव मांडला. त्यानंतर गटारांच्या कामाचा विषय समोर आला. पूर्वी गटारांची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण व्हायची. कामगार गटारांची फावड्याने रुंदी करायचे आणि दगडाने बांधून गटार पूर्ण करायचे. पण आज काँक्रीटच्या नावाखाली जेसीबी लावून गटारांची खोदाई होते. उगाचच गटारांची खोदाई करून वर काँक्रिट ओतून गटार बंद केले जातात. मग रस्त्यावरून वाहणारे पाणी गटारात येणार कसे असा प्रश्न प्रशांत आपटे यांनी उपस्थित केला. पॉवर हाउस कडील गटार मध्ये नेहमी पाणी असते. गिरपवाडा येथील गटाराच्या कामाची वाट लावली, हॉस्पिटल नाका येथील गटार योग्य पद्धतीने बांधला नाही. भटवाडी येथे काम सुरू असलेल्या गटाराची अवस्था ही तशीच आहे. त्यामुळे अंदाजपत्रक चुकीच्या पद्धतीने केले जाते. ही आलेला निधी खर्च करावा एवढेच डोळ्यासमोर असतं. तेही प्रशासनाने सांगितलं पाहिजे. अशीच चुकीच्या पद्धतीने काम होत राहिली तर नागरिक आम्हाला जाब विचारणार अशी भूमिका सर्व नगरसेवकांनी सभेत मांडली. त्यामुळे शहरातील गटारांची काम सुयोग्य पद्धतीने करण्याचे आदेश नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.

वेंगुर्ले निशाण तलावातील माशांचा लिलाव बाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला. एक महिन्यापूर्वी झालेल्या सभेत हा विषय आला होता. परंतु महिना झाला तरी प्रशासनाने त्याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे प्रशासनाच्या कामाबाबत सर्वांनीच नापसंती व्यक्त केली. दरम्यान या तलावातील माशांच्या पाहणीसाठी आज काहीजण आले होते. ते तलावाची पाहणी करून एग्रीमेंट केल्यानंतर मासे काढण्याची प्रक्रिया केली जाणार आहे अशी माहिती सभेत सागर चौधरी यांनी दिली. यानंतर अन्य विषयांवरही चर्चा झाली.