सक्षम नेतृत्वाद्वारे शाश्वत जलव्यवस्थापनाचा निर्धार
सावंतवाडी । प्रतिनिधी : पाणी वापर संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा सिंचन व्यवस्थापनातील सहभाग वाढवून पाण्याचे शाश्वत, समन्यायी व कार्यक्षम वितरण सुनिश्चित करण्यासाठी सक्षम नेतृत्व निर्माण होणे अत्यंत आवश्यक आहे, त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. संदीप महाले यांनी केले.
सिंधुदुर्ग पाटबंधारे विभाग, आंबडपाल अंतर्गत पाटबंधारे उपविभाग सावंतवाडी-चराठा येथे आयोजित पाणी वापर (WUA) संस्था अध्यक्ष व संचालकांच्या प्रशिक्षण कार्यशाळेत अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते. ही कार्यशाळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.
सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांना अभिवादन
कार्यशाळेच्या सुरुवातीला भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेस कार्यकारी अभियंता श्री. संदीप महाले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. धरणे, कालवे व सिंचन व्यवस्थापनाच्या माध्यमातून देशाच्या जलसंपदा विकासात सर विश्वेश्वरय्या यांनी दिलेल्या अमूल्य योगदानाचा यावेळी गौरवपूर्ण उल्लेख करण्यात आला. या प्रसंगी व्यासपीठावर स्वागताध्यक्ष म्हणून पाटबंधारे उपविभाग सावंतवाडीचे उपविभागीय अधिकारी श्री. म. बा. डांबरेकर उपस्थित होते, त्यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले.
तज्ज्ञांचे मार्गदर्शन
या कार्यशाळेचे मुख्य आयोजन पाटबंधारे उपविभाग सावंतवाडी व श्री. गणेश घाणेकर (NGO) यांनी संयुक्तपणे केले होते. यामध्ये छत्रपती संभाजीनगर येथील ‘वाल्मी’चे सेवानिवृत्त प्राध्यापक डॉ. रे. भ. भारस्वाडकर यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन केले. त्यांनी पाणी वापर संस्थांच्या संचालकांचे कर्तव्य व जबाबदाऱ्या, महाराष्ट्र व्यवस्थापित सिंचन प्रणाली अधिनियम २००५ व नियम २००६, पाण्याचे समन्यायी वितरण, पाणीपट्टी व आर्थिक व्यवस्थापन तसेच दफ्तर व अभिलेख व्यवस्थापन या विषयांवर सखोल आणि व्यवहार्य माहिती दिली.
नोंदणी प्रमाणपत्रांचे वितरण
या कार्यशाळेचे औचित्य साधून सनमटेंब-सांगेली, पुळस व हातोरी येथील नव्याने नोंदणीकृत पाणी वापर संस्थांना कार्यकारी अभियंता श्री. संदीप महाले व उपविभागीय अधिकारी श्री. म. बा. डांबरेकर यांच्या हस्ते अधिकृत नोंदणी प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. यामुळे पाणी वापर संस्था सक्षमीकरण अभियानाला अधिक बळ मिळाले आहे.
शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
या प्रशिक्षणात सावंतवाडी, कुडाळ व दोडामार्ग तालुक्यातील शिरवळ, आंबोली, सनमटेंब-सांगेली, निळेली, पुळस, हातोरी व ओरोस येथील लघु पाटबंधारे प्रकल्पांच्या पाणी वापर संस्थांचे अध्यक्ष, संचालक व प्रतिनिधींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
परिश्रम व कृतज्ञता
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन कनिष्ठ अभियंता सौ. कांचन बामणे तसेच सेवानिवृत्त उपअभियंता श्री. एल. एम. डूबळे यांनी केले. शेवटी उपविभागीय अधिकारी श्री. म. बा. डांबरेकर यांनी सर्वांचे आभार मानले. ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी कनिष्ठ अभियंता श्री. शैलेश परब, श्री. महेश आंदुर्लेकर यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
“शेतकऱ्यांचा सहभाग – सिंचन व्यवस्थापनाचा भक्कम पाया” आणि “सक्षम पाणी वापर संस्था, समृद्ध शेतकरी आणि शाश्वत जलव्यवस्थापन” या ब्रीदवाक्यांनुसार पाणी वापर संस्था अधिक सक्षम, स्वयंपूर्ण व शेतकरी-केंद्रित करण्याचा निर्धार या कार्यशाळेच्या निमित्ताने व्यक्त करण्यात आला.












